जम्मू-काश्मीर : पाकिस्ताने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. तर, पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून लष्करी चौक्या आणि गावांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तांगधर सेक्टरमध्ये तैनात असलेले दोन जवान शहीद झाले आहेत. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त तीन नागरिक जखमी झाले आहेत.
याशिवाय, पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात परिसरातील दोन घरांचे नुकसान झाले आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनीही पाक सैन्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लामध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता.
पाकव्याप्त काश्मीरमधून 500हून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीतपाकव्याप्त काश्मीरमधून 500 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या उच्चाधिकाऱ्यांनी दिली आहे. PoKमधल्या नियंत्रण रेषेजवळ विविध प्रशिक्षण शिबिरांमध्ये 500 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीची संधी शोधत आहेत. तसेच 200 ते 300 दहशतवादी पाकिस्तानच्या मदतीनं या क्षेत्राला अशांत ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्येच सक्रिय आहेत.
अनंतनागमध्ये लष्कराकडून हिजबुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात गेल्या बुधवारी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतावादी संघटनेचे सदस्य होते. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुलचा कमांडर नासिर चद्रू याचाही समावेश आहे.