जम्मू : जम्मू-काश्मीरच्या नरवाल परिसरात एकामागून एक असे दोन स्फोट झाले आहेत. नरवाल येथे झालेल्या या दुहेरी स्फोटात सहा जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. हे स्फोट नरवालच्या ट्रान्सपोर्ट नगरच्या यार्ड क्रमांक-7 मध्ये झाले.
या स्फोटांची माहिती मिळताच एडीजीपी जम्मू (ADGP Jammu Zone) मुकेश सिंह घटनास्थळी पोहोचले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन वाहनांमध्ये स्फोट झाले असून त्यात सहा जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह अन्य पोलिस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तर एडीजीपी जम्मू झोन मुकेश सिंह यांनीही जम्मूच्या नरवाल भागात दुहेरी स्फोट झाल्याची पुष्टी केली आहे, ज्यात सहा जण जखमी झाले आहेत. नरवालचा ट्रान्सपोर्ट नगर परिसर जिथे बॉम्बस्फोट झाले ते ट्रकचे केंद्र म्हणून ओळखले जाते.
घटनास्थळावरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये स्फोटानंतर पोलिस वाहनांची तपासणी करताना दिसत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा जम्मूमधून जात आहे. यातच, जम्मूमध्ये हे स्फोट झाल्यामुळे खळबळ सुरू आहे.