जयपूर - राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाचे (बसपा) राष्ट्रीय समन्वयक आणि प्रभारी यांची गाढवावरून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (22 ऑक्टोबर) बसपाच्या कार्यकर्त्यांनीच बसपाचे राष्ट्रीय समन्वयक आणि उपाध्यक्ष रामजी गौतम आणि प्रभारी सीताराम मेघवाल यांच्या तोंडाला काळे फासून गाढवावरून धिंड काढल्याची घटना घडली आहे. राजस्थानमधील बसपाचे कार्यकर्ते हे आपल्याच पक्षातील काही लोकांमुळे नाराज असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर येथे आलेल्या बसपाच्या राष्ट्रीय समन्वयकांसह दोघांना नाराज असलेल्या काही कार्यकर्त्यांनी घेरलं. तसेच दोन गाढवं आणि हातात ग्रीस घेऊन कार्यकर्ते आले होते. त्यांनी रामजी गौतम आणि प्रभारी सीताराम मेघवाल यांच्या तोंडाला काळे फासले आणि गळ्यात चपलांचा हार घातला. तसेच जबरदस्तीने त्यांना गाढवावर बसवण्यात आले आणि त्यांची धिंड काढण्यात आली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बसपा प्रमुख मायावती यांनी या घटनेनंतर ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. तसेच काँग्रेसने आधी राजस्थानमध्ये बसपाचे आमदार फोडले आणि आता राज्यातून आंबेडकरवादी चळवळ संपवण्यासाठी बसपाच्या वरिष्ठ नेत्यांवर हल्ले केले जात आहेत. राजस्थानात जे घडले ते अत्यंत निषेधार्ह आहे. काँग्रेसने घडवून आणलेल्या या कृत्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा देखील मायावती यांनी दिला आहे.
राजस्थानमध्ये बसपाचे सहा आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने याआधीही काही दिवसांपूर्वी मायावती संतप्त झाल्या होत्या. पक्षाला खिंडार पडल्याने संतप्त झालेल्या मायावती यांनी ट्विटरवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. काँग्रेसमुळेच देशात जातीयवादी शक्तींची ताकद वाढत आहेत, असा आरोप मायावती यांनी केला होता. तसेच आपल्या ट्विटमध्ये ''काँग्रेस पक्षाच्या दुटप्पी भूमिकेमुळे देशात जातीयवादी शक्ती मजबूत होत आहेत. त्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्ष अशा जातीयवादी, सांप्रदायिक शक्तींना कमकुवत करण्याऐवजी त्या शक्तींविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच कमकुवत करण्यात गुंतली आहे. त्यामुळे जनतेने सावध राहिले पाहिजे'' असं म्हटलं होतं.