कोलकाता : यंदाची लोकसभा निवडणूक भाजपने लबाडीने जिंकली आहे. त्यासाठी या पक्षाने ईव्हीएम, सीआरपीए, निवडणूक आयोगाचा वापर केला, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. त्या म्हणाल्या की, आता आमदारांना फोडण्यासाठी त्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये व पेट्रोलपंप देण्याची लालूच भाजपकडून दाखविली जात आहे.
या राज्यामध्ये २१ जुलै १९९३ साली पोलिसांच्या गोळीबारात १३ युवक काँग्रेस कार्यकर्ते ठार झाले होते. २६ वर्षांपूर्वी ही घटना घडली त्यावेळी ममता बॅनर्जी युवक काँग्रेसच्या नेत्या होत्या. या गोळीबार घटनेच्या स्मरणार्थ पश्चिम बंगालमध्ये २१ जुलै रोजी दरवर्षी हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
त्यानिमित्त रविवारी आयोजिलेल्या मेळाव्यात ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांत ईव्हीएम यंत्रांऐवजी कागदी मतपत्रिका वापरण्यात याव्यात अशी मागणी मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे. कर्नाटकप्रमाणे सर्व राज्यांत भाजपने आमदार फोडाफोडीचे सत्र सुरू ठेवले तर नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार पुढची दोन वर्षेही टिकणार नाही.
विधानसभेला तृणमूलचा पराभव अटळ : बाबूल सुप्रियो२०२१ साली पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसचा सणसणीत पराभव होणार आहे, असे केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी म्हटले आहे. त्यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, या राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेस पूर्वीपेक्षा निम्म्याच जागा जिंकू शकला.आगामी विधानसभा निवडणुकांत या पक्षाचा सफायाच होणार आहे. पश्चिम बंगालमधील सध्याच्या स्थितीमुळे राज्यातील, तसेच जगभरातील बंगाली भाषकांना मान खाली घालावी लागत आहे.