नवी दिल्ली - गोदावरी नदीत 15 सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या बोट दुर्घटनेत आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममधील अप्पाला राजू आणि भाग्यलक्ष्मी यांनी आपल्या दोन्ही मुलींना गमावलं होतं. या दुर्घटनेनंतर या दाम्पत्याला खूप मोठा धक्का बसला होता. पण आता दोन वर्षांनी पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण परत आहेत. कारण दोन वर्षांनंतर त्याच तारखेला अप्पाला राजू आणि भाग्यलक्ष्मी यांना जुळ्या मुली झाल्या आहेत. घरामध्ये जुळे कन्यारत्न आल्याने 'हा देवाचाच आशीर्वाद' असं म्हणत कुटुंबीयांनी पुन्हा एकदा आनंद साजरा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर 2019 रोजी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील काचुलुरूजवळ गोदावरी नदीत एक बोट बुडाली होती. या दुर्घटनेत अप्पाला राजू आणि भाग्यलक्ष्मी यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना गमावलं होतं. यापैकी एक मुलगी अवघ्या एका वर्षाची आणि दुसरी मुलगी तीन वर्षांची होती. या दोन्ही मुली यावेळी आपल्या आजीसोबत तेलंगणातील भद्रद्री कोठागुडेम जिल्ह्यातील गोदावरीच्या काठावर असलेल्या प्राचीन भद्राचलम मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. मात्र बोटीला भीषण अपघात झाला आणि बोट गोदावरी नदीत उलटून बुडाली होती.
या बोट दुर्घटनेत तब्बल 50 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान, आता बरोबर दोन वर्षांनंतर 15 सप्टेंबर याच तारखेला या जोडप्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत. अप्पाला राजू आणि भाग्यलक्ष्मी यांना जुळ्या मुली झाल्या आहेत. "आम्हाला खूप जास्त आनंद झाला आहे. ही देवाची किमया आहे. हा देवाचाच आशीर्वाद आहे" अशा शब्दांत यावेळी या दाम्पत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दोन्ही मुली आणि आई हे अगदी सुखरुप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.