बंगळुरू - कर्नाटकमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यानंतर, आता मंत्रीमंडळ विस्तार करण्याचा निर्णय झाला असून २४ जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. त्यामध्ये, ९ जण प्रथमच आमदार झाले असून, आमदार होताच ते मंत्री बनले आहेत. २० मे रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह १० आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. आता, २४ आमदारांनी शपथ घेतली. त्यामुळे, कर्नाटक मंत्रीमंडळात एकूण ३४ मंत्री बनले आहेत. त्यामध्ये, एक महिला मंत्री आहे.
कर्नाटकसाठी मंत्रीपदाची शपथ घेण्यात आली, पण अद्याप खातेवाटप झाले नाही. आज सायंकाळपर्यंत खातेवाटप होईल, असे राज्यमंत्री केएच. मुनियप्पा यांनी म्हटलंय. तत्पूर्वी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेत खातेवाटपावर चर्चा केल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धरमैय्या यांच्या मंत्रीमंडळात ६ वोक्कालिगा तर ८ लिंगायत मंत्र्यांना स्थान देण्यात आलं आहे. तीन मंत्री अनुसूचित जाती, दोन मंत्री अनुसूचित जमाती आणि इतर ५ हे कुरुबा, राजू, मराठा, एडिगा आणि मोगावीरा या मागास प्रवर्गातील आहेत. तसेच, एका ब्राह्मण नेत्यालाही मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. ओल्ड म्हैसूर आणि कल्याण कर्नाटक क्षेत्रातील बहुतांश आमदारांना मंत्रीपदाची संधी देण्यात आलीय. येथील ७-७ आमदारांना मंत्रीपदी संधी मिळाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी वरिष्ठ आणि कनिष्ठ आमदारांना सम-समान संधी देत, जातीय समीकरणही समतोलपणे साधलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांसमवेत शपथ घेतलेल्या पहिल्या ८ मंत्र्यांपैकी दक्षिण कर्नाटकचे ५ मंत्री होते, तर उत्तरमधून केवळ ३. या ८ पैकी ३ मंत्री एससी समुदायाचे होते. त्यासोबतच इतर समाजालाही मंत्रिमंडळात स्थान देत काँग्रसने जातीय समतोल साधला आहे.