भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) जहाजाने भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पकडल्या गेलेल्या सात भारतीय मच्छिमारांची पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीच्या (PMSA) ताब्यातून सुटका केली. ही घटना रविवारी (17 नोव्हेंबर 2024) घडली. या भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानी जहाजाने पकडले होते.
भारतीय तटरक्षक जहाज 'अग्रिम'ने पाकिस्तानच्या सागरी सीमेजवळ तैनात असताना 'नुसरत' या पाकिस्तानी जहाजाचा पाठलाग केला. सुमारे दोन तास चाललेल्या या पाठलागात भारतीय जहाजाने पाकिस्तानी जहाजाला थेट संदेश दिला की, पाकिस्तानी जहाज भारतीय मच्छिमारांना कोणत्याही परिस्थितीत घेऊन जाऊ शकत नाही.
काय म्हणाले अधिकारी? -संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, "भारतीय तटरक्षक जहाज अग्रिमने पाकिस्तानी जहाज पीएमएस नुसरतचा पाठलाग केला आणि मच्छिमारांना भारतीय जलक्षेत्रातून नेणे अस्वीकार्य असल्याचे स्पष्ट केले. 'काल भैरव' या मासेमारी नौकेवरील या मच्छिमारांना भारतीय सागरी हद्दीतच पकडण्यात आले होते."
मच्छीमार सुखरूप - या बचाव मोहिमेत सुटका करण्यात आलेले सातही मच्छिमार सुखरूप आहेत. मात्र, या प्रक्रियेदरम्यान मच्छिमारांची 'काल भैरव' नावाची बोट खराब होऊन ती बुडाली, असे आयसीजीने म्हटले आहे. ICG च्या निवेदनात म्हटले आहे की, मच्छिमारांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणतीही मोठी शारीरिक दुखापत झालेली नाही. 18 नोव्हेंबर रोजी, ICG जहाज ओखा बंदरावर परत आले, जिथे या घटनेची संयुक्त तपासणी करण्यात आली. या तपासात आयसीजी, राज्य पोलीस, गुप्तचर संस्था आणि मत्स्य विभाग यांचा सहभाग होता. या प्रकरणात, संपूर्ण विभागाने बचाव कार्याचा तपास सुरू केला आहे.