नवी दिल्ली- हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील हरियाणा केंद्रीय विश्वविद्यालयात शिकत असणाऱ्या दोन काश्मीरी विद्यार्थ्याला जवळपास 15 जणांनी बेदम मारहाण केली. जावीद इकबाल असं मारहाण झालेल्या एका विद्यार्थ्याचं नाव आहे. शुक्रवारी नमाज पठण करून परतत असताना या तरूणाला मारहाण झाली. नमाजनंतर हे विद्यार्थी बाजारात काही सामान आणण्यासाठी गेले असता ही घटना घडली आहे. मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. जावीदने ट्विट करून यांसदर्भातील तक्रार जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडे केली. हरियाणा पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे.
मेहबूबा मुफ्ती यांनी संदर्भातील ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये हरिणायाच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करत मुफ्ती यांनी म्हंटलं की,'हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये काश्मीरी विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे मला धक्का बसला आहे. या प्रकरणातील दोषींना शोधून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी माझी हरियाणा सरकारकडे विनंती आहे.
दुसरीकडे, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते उमर अब्दुल्ला यांनी या प्रकरणाची निंदा केली आहे. काश्मीरी विद्यार्थ्याला मारहाण खूप भयानक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर जे म्हंटलं होतं त्याच्याविरोधात आहे. हरियाणा सरकार या हिसेंच्या विरोधात कारवाई करेल, अशी आशा आहे. असं ट्विट उमर अब्दुल्ला यांनी केलं.