खाणींतून हिरे काढण्यासाठी २ लाख झाडांचा बळी? पर्यावरणवादी करणार तीव्र आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 05:54 AM2021-05-24T05:54:32+5:302021-05-24T05:55:13+5:30

Diamonds mines in Madhya Pradesh: बक्सवाहामधील जंगलातल्या झाडांना वाचविण्यासाठी समाजमाध्यमांवर सेव्ह बक्सवाहा फॉरेस्ट ही मोहीम पर्यावरणवाद्यांकडून चालविण्यात येत आहे.

2 lakh trees sacrificed to extract diamonds from mines? Environmentalists will make intense agitation | खाणींतून हिरे काढण्यासाठी २ लाख झाडांचा बळी? पर्यावरणवादी करणार तीव्र आंदोलन

खाणींतून हिरे काढण्यासाठी २ लाख झाडांचा बळी? पर्यावरणवादी करणार तीव्र आंदोलन

Next

भोपाळ - मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बक्सवाहा जंगल भागात हिऱ्यांच्या खाणी सापडल्या आहेत. तेथील हिरे काढण्यासाठी या जंगलातील सव्वादोन लाख झाडे कापावी लागणार आहेत. ही वृक्षतोड होऊ नये म्हणून आता एक लाखाहून अधिक पर्यावरणवादी पुढे सरसावले असून, ते या झाडांना बिलगून आंदोलन करण्याच्या विचारात आहेत.

बक्सवाहामधील जंगलातल्या झाडांना वाचविण्यासाठी समाजमाध्यमांवर सेव्ह बक्सवाहा फॉरेस्ट ही मोहीम पर्यावरणवाद्यांकडून चालविण्यात येत आहे. या परिसरात २,१५,८७५ झाडे असून त्यात साग, जांभूळ, पिंपळ, तेंदू, अर्जुन अशी अनेक प्रकारची झाडे आहेत व त्यांच्यावर भविष्यात कुऱ्हाड चालवली जाणार आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी देशभरातील ५०हून अधिक संस्थांच्या प्रतिनिधींचा ९ मे रोजी एक वेबिनार झाला. बक्सवाहा येथील खाणीत असलेल्या हिऱ्यांची किंमत कित्येक अब्ज रुपये असल्याचे सांगण्यात येते. हे हिरे खाणीतून काढण्यासाठी वृक्षतोड करण्यास प्रतिबंध करण्याकरिता दिल्लीतील नेहा सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  

पन्नापेक्षा १५ पट अधिक हिरेसाठा
छतरपूर येथील बक्सवाहा जंगलाच्या पोटातील खाणीत ३.४२ कोटी कॅरेटचे हिरे असण्याची शक्यता आहे. देशातला आजवरचा मोठा हिरेसाठा मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील खाणीत आहे असे मानले जात होते; मात्र तेथील हिरेसाठ्यापेक्षा बक्सवाहातील प्रमाण पंधरा पट अधिक आहे. पन्नाच्या खाणीत २२ लाख कॅरेट हिरे असून, त्यातील आजवर १३ लाख कॅरेट हिरे बाहेर काढण्यात आले आहेत. बक्सवाहा येथील हिरे खाणीतून काढण्यासाठी ३८२ हेक्टर जमिनीवरील झाडे कापावी लागणार आहेत.

Web Title: 2 lakh trees sacrificed to extract diamonds from mines? Environmentalists will make intense agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.