राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी राहणारा एक जवान काश्मीर इथं शहीद झाला. गावातील सगळे गावकरी जवानाला मानवंदना देण्यासाठी अमर रहे अशा घोषणा देत होते. शहीद जवानाचे काका घरच्या तिसऱ्या मजल्यावर उभे राहून घोषणा देत होते मात्र अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. या दुर्घटनेत ते गंभीररित्या जखमी झाले. गोंधळात त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शनिवारी काश्मीरमध्ये लष्कराच्या एका कार्यक्रमावेळी अपघात घडला. त्यात सैन्याचा ट्रक दरीत पडला. या अपघातात राजस्थानच्या अलवर इथं राहणारा जवान नितेश यादव यांचाही मृत्यू झाला. नितेशच्या निधनाची बातमी त्याच्या कुटुंबाला मिळाली, गावात या बातमीने शोककळा पसरली. नितेश यादव अमर रहे अशा घोषणा गावकरी देऊ लागले. शहीद जवानाच्या घराबाहेर लोकांची गर्दी झाली. तिथे लोक घोषणा देत होते. त्यावेळी घरच्या तिसऱ्या मजल्यावर नितेशचे काका अजित यादव हे हात उंचावून नितेश अमर रहे अशा घोषणा देत होते.
या घोषणा सुरू होत्या तितक्यात अजित यादव यांचा पाय घसरला आणि ते तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले. या दुर्घटनेने घराबाहेर गोंधळ माजला. त्यात अजित यादव यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले परंतु त्याआधीच त्यांचा जीव गेला. या घटनेने एकाच वेळी कुटुंबातील २ जणांच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला. शनिवारी पुतण्या नितेश यादव हा शहीद झाला तर रविवारी नितेशचे काका अजित यादव हेदेखील जग सोडून गेले.
नितेश यादव हे सीआरपीएफमध्ये तैनात होते. नुकतेच एक आठवड्याची सुट्टी संपवून ते कामावर परतले होते. गावात एकाच वेळी काका पुतण्याच्या मृत्यूने गावकरीही स्तब्ध झाले. नितेश यादव यांचा मृतदेह गावात येण्यापूर्वीच अजित यादव यांचा मृत्यू झाला. अजित यादव यांचा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवण्यात आला आहे. नितेश यादव यांचा मृतदेह गावात आल्यानंतर आता दोन्ही मृतदेहांवर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.