बोगद्यातील कामगारांच्या बचावासाठी २ नवे पर्याय; पहिला उभे ड्रिलिंग अन् दुसरा हाताने खोदून काढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 06:09 AM2023-11-26T06:09:30+5:302023-11-26T06:10:45+5:30
Uttarkashi Tunnel Accident: गेल्या १३ दिवसांपासून सिलिक्यारा बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामगारांच्या सुटकेतील अडचणी दूर होताना दिसत नाहीत. अखेरच्या क्षणी ऑगर मशिन तुटल्याने कामगारांच्या सुटकेसाठी आता दोन पर्यायांचा विचार केला जात आहे.
उत्तर काशी - गेल्या १३ दिवसांपासून सिलिक्यारा बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामगारांच्या सुटकेतील अडचणी दूर होताना दिसत नाहीत. अखेरच्या क्षणी ऑगर मशिन तुटल्याने कामगारांच्या सुटकेसाठी आता दोन पर्यायांचा विचार केला जात आहे. बोगद्याला उभे ड्रिल मारून थेट कामगारांपर्यंत पोहोचायचे किंवा मानवी ड्रिलिंग सुरू करणार असल्याचे बोगदातज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी सांगितले.
कामगारांच्या सुटकेसाठी ड्रिलिंगचा पर्याय म्हणून ऑगर मशिन मागवण्यात आली होती. या मशिनने ४८ मीटरपर्यंत यशस्वी ड्रिलिंग केले; पण त्यानंतर मशिनसमोर अनेक अडथळे येत आहेत.
प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटेही...
- आता सुटकेसाठी पर्याय काय, असे विचारले असता डिक्स म्हणाले की, आमच्यासमोर अनेक पर्याय आहेत; पण त्यातील प्रत्येक पर्यायाचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. आमचा सामना डोंगराशी आहे.
- ड्रिलिंग करताना कामगारांना इजा होऊ नये, मदतकार्य करणारेही सुरक्षित राहावेत, अशा दोन्ही गोष्टी पाहाव्या लागतात.
- आधीच बोगद्यात एकदा डोंगर खचला आहे. पुढेही खचू शकतो. त्यामुळे सावधगिरीने ड्रिलिंग करावे लागत आहे, असेही डिक्स यांनी सांगितले.
ऑगर मशिन तुटल्याने आता अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी उभे ड्रिलिंग केले जाणार आहे. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री डोंगरावर पाठविण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे.
उभ्या बोगद्यासाठी जागा शोधल्या
डोंगराच्या वरच्या बाजूने उभा बोगदा खोदून कामगारांपर्यंत पोहोचण्याचा पर्यायही तपासला जात आहे. उभा बोगदा खोदण्यासाठी शनिवारी सकाळी एक मोठे ड्रिलिंग मशिन डोंगरावर नेण्यात आले. दाेन जागाही बोगद्यासाठी शोधण्यात आल्या.
प्लाझ्मा कटर आणले जातेय : मुख्यमंत्री धामी
ऑगर मशिनची पाती मलब्यात अडकून पडली आहेत. उरलेले काम पूर्ण करण्यासाठी हैदराबादहून प्लाझ्मा कटर विमानाद्वारे मागविण्यात येत आहे, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी सांगितले.