ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - दोन चिमुरड्या बालिकांवर झालेल्या बलात्कारांच्या घटनांनी राजधानी दिल्ली पुन्हा हादरली असून या घटनांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलिस व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. महिलांना सुरक्षा पुरवण्यात दिल्ली पोलिस संपूर्णपणे अपयशी ठरले आहेत, चिमुरड्या बालिकांवरील बलात्काराच्या घटना उघडकीस येत असताना पंतप्रधान आणि त्यांचे नायब राज्यपाल कुठे आहेत, काय करत आहेत? असा सवाल संतप्त केजरीवालांनी ट्विटरवरून विचारला आहे.
दिल्लीत दोन चिमुरड्या बालिकांवर सामूहिक बलात्काराच्या दोन घटना आज उघडकीस आल्या असून त्यामुळे राजधानी पुन्हा हादरली आहे. एका घटनेत आनंद विहार परिसरात एका पाच वर्षीय बालिकेवर तिच्या शेजा-याने दोन साथीदारांसह सामूहिक बलात्कार केला. पीडित बालिकेचे आई-वडील घरात नसल्याची संधी साधत या तीन नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला, या घटनेत ती मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर दुस-या घटनेत अवघ्या अडीच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही चिमुरडी नांगलोई येथे आपल्या पालकांसोबत रामलीला बघण्यास आली होती, मात्र त्यावेळी तेथे थोड्या काळासाठी वीज गेली. याचाच फायदा घेत काही नराधमांनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिला एका बागेत फेकून दिले.
या दोन्ही घटना अतिशय शरमेची आणि दु:खदायक असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्ली पोलिस नागरिकांना विशेषतं महिलांना सुरक्षा पुरवण्यात संपूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असे ताशेरे त्यांनी ओढले आहेत.