श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दरम्यान, परिसरात आणखी एक दहशतवादी असून जवानांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या चकमकीदरम्यान एक जवानदेखील जखमी झाला आहे. सोमवार (18 डिसेंबर) संध्याकाळची ही घटना आहे.
शोपियान जिल्ह्यातील बटमुरान गावातील एका घरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवान, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी परिसराला घेराव घातला. यावेळी पळ काढण्याच्या हेतूनं दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली, मात्र शोध मोहीमदरम्यान जवानांना दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले.
जम्मू काश्मीर पोलीसचे इन्स्पेक्टर जनरल मुनीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आलेत, मात्र तिसरा दहशतवादी अद्यापपर्यंत जिवंत असून तो परिसरातीलच घरात लपून बसला आहे. दरम्यान, यावर्षी शोधमोहीमेदरम्यान सुरक्षा रक्षकांनी आतापर्यंत 200 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 2016 वर्षात सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांविरोधातील कारवाईमध्ये एकूण 165 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली होती. तर या वर्षी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 77 जवान शहीद झालेत, तर 2016 मध्ये 88 जवान शहीद झाले होते.
एकीकडे दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी आणि हल्ले करण्याचे सातत्याने प्रयत्न होत असतानाच लष्करही पूर्ण सामर्थ्याने त्यांना चोख प्रत्युत्तर देत असते. त्यातच दहशतवादी गटांचे कंबरडे मोडण्यासाठी लष्कराकडून जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. त्यानुसार काश्मीरमध्ये वावर असलेल्या बड्या दहशतवाद्यांना पद्धतशीररीत्या टिपण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी दक्षिण काश्मीरमध्ये सहा पोलिसांची हत्या करणारा लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी बशीर लष्करी तसेच हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सब्जार अहमद भट्ट यांचाही ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये समावेश आहे.लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या काश्मीरमध्ये कारवाया करत असलेल्या दहशतवाद्यांची हिट लिस्ट लष्कराने तयार केली आहे. त्या हिट लिस्टच्या आधारावर लष्कराकडून ऑपरेशन हंट डाऊन अंतर्गत दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. दहशतवाद्यांसोबतच्या सर्वाधिक चकमकी या दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियाँन आणि अनंतनाग जिल्ह्यात झाल्या आहेत. तर उर्वरित चकमकी या उत्तर काश्मीरमधील बांदिपोरा आणि कुपवाडा जिल्ह्यात आणि मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.