लोकमत न्यूज नेटवर्कबेळगाव (कर्नाटक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत (पीएम-किसान) आठ कोटींहून अधिक लाभार्थींना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे १६,००० कोटी रुपयांचा १३वा हप्ता जारी केला. योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी ६,००० रुपये दिले जातात. याचा फायदा देशातील ८ कोटी शेतकऱ्यांना होतो.
कार्यक्रमादरम्यान मोदींनी पुनर्विकसित बेळगाव रेल्वेस्थानकाची इमारत आणि बेळगाव येथील रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्प राष्ट्राला समर्पित केली. सुमारे ९३० कोटी रुपये खर्चून विकसित केलेला हा प्रकल्प, व्यस्त मुंबई - पुणे - हुबळी - बंगळुरू रेल्वे मार्गाची क्षमता वाढवेल.
येडियुरप्पांवर स्तुतिसुमनेमोदी यांनी बी. एस. येडियुरप्पा वाढदिवसानिमित्त शिवमोग्गा सार्वजनिक सभेतील लोकांना मोबाइलचा ‘फ्लॅशलाइट’ चालू करण्यास सांगितले. यावेळी अनेक लोकांनी ‘फ्लॅशलाइट’ चालू करून मोदींना प्रतिसाद दिला. पंतप्रधानांनी येडियुरप्पांना वाकून नमस्कार केला आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
खरगेंचे वाईट वाटते : पंतप्रधान मोदीकाँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे नामधारी अध्यक्ष असून, रिमोट कंट्रोल कोणाकडे आहे हे सर्वांना कळून चुकले आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगाव येथील एका सभेत केला. काँग्रेसमधील खास कुटुंबासमोर कर्नाटकातील एका नेत्याचा अपमान करण्यात आला आहे. ज्यांना ५० वर्षांची संसदीय कारकीर्द लाभली, असे या मातेचे सुपुत्र खरगे यांचा मला खूप आदर आहे. जनसेवेसाठी त्यांनी खूप काही करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या रायपूर अधिवेशनात खरगे यांचा अपमान झाल्याचे पाहून मला खूप वाईट वाटले. सर्वजण उन्हात उभे होते, पण छत्री खरगेजींसाठी नाहीतर दुसऱ्यांसाठी लावण्यात आली. खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, पण त्यांना काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने वागवले जाते, ते पाहता रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात आहे, हे आता सर्वांना कळून चुकले आहे, असेही मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदीजी, कोणाच्या छत्रछायेखाली तुमच्या ‘परममित्रा’ने देशाच्या आकाशापासून पाताळापर्यंत सर्व काही लुटले? आम्ही तिरंग्याखाली उभे असलेले काँग्रेसवाले आहोत, ज्यांनी ‘कंपनी राज’ला हरवून देश स्वतंत्र केला आणि देशाला ‘कंपनी राज’ कधीच होऊ देणार नाही. मला सांगा, अदानीवर जेपीसी कधी होणार?- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस