Agneepath Scheme, Railway Loss: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ( Ashwini Vaishnaw ) यांनी संसदेत आज अतिशय धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध झाल्यामुळे देशभरात तब्बल दोन हजारहून अधिक गाड्यांचे नुकसान झाले. रेल्वेमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात असेही सांगितले की १५ जून ते २३ जून दरम्यान २ हजार १३२ गाड्या रद्द करण्यात आल्या. या योजनेला काही लोकांनी प्रचंड विरोध केला. यावेळी लोकांनी हिंसक निदर्शने केली. गाड्या थांबवून त्यांना आग लावण्यात आली. सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. या हिंसक आंदोलनात केवळ रेल्वे मालमत्तेचे तब्बल २५९.४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
केंद्र सरकारची अग्निपथ योजना सुरू केल्यानंतर हे सर्व घडल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. वास्तविक, केंद्र सरकारला अग्निपथ योजनेद्वारे सैन्यातील सैनिकांचे सरासरी वय कमी करायचे आहे. जेणेकरून आपल्या लष्करी जवानांना प्रोत्साहन मिळत राहिला आणि त्यांची ऊर्जा कमी होणार नाही. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणांवर झालेल्या गोंधळामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना भरलेल्या परताव्याच्या रकमेबाबत वेगळा डेटा ठेवला जात नाही. त्यामुळे त्याचाही यात समावेश आहे.
"१४ जून ते ३० जून या १६ दिवसांच्या कालावधीत ट्रेन रद्द होणे आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनात रेल्वे मालमत्तेचे २५९.४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या कालावधीत गाड्या रद्द केल्यामुळे रेल्वेने रेल्वे प्रवाशांना १०२.९६ कोटी रुपये परत केले. पण आता अग्निपथ योजनेमुळे रद्द झालेल्या सर्व प्रभावित रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत", अशी तपशीलवार माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.
"भारतीय राज्यघटनेच्या 7 व्या अनुसूची अंतर्गत पोलीस आणि कायदा आणि सुव्यवस्था हे राज्याचे विषय आहेत आणि त्यामुळे रेल्वेवरील गुन्ह्यांचे प्रतिबंध, शोध, नोंदणी आणि तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखणे ही राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे हे सर्व प्रश्न आता संबंधिक राज्य सरकारच्या एजन्सी आणि सरकारी रेल्वे पोलिस आणि राज्य पोलिसांमार्फत सोडवले जात आहेत", असेही ते म्हणाले.