हिमाचलात पेच वाढला! मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच; २ दिग्गजांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 06:29 AM2022-12-10T06:29:53+5:302022-12-10T06:31:20+5:30
मुख्यमंत्रिपदासाठी प्रतिभा सिंह, सुखविंदरसिंग सुख्खू यांचा दावा
आदेश रावल
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातकाँग्रेसला बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयाबद्दल पक्षापुढे पेच निर्माण झाला आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा आणि प्रभारी राजीव शुक्ला शुक्रवारी आमदारांच्या बैठकीसाठी गेले असता त्यांना ज्येष्ठ नेत्या प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. सुखविंदरसिंग सुख्खू यांनीही दावा केला आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये शिमला पक्ष कार्यालयात धक्काबुक्की झाली. त्यामुळे ही बैठक तब्बल ५ तास विलंबाने सुरू झाली. निरीक्षकांनी सर्व आमदारांचे मत जाणून घेतले. ते वरिष्ठांना कळविण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. निरीक्षकांनी आमदारांच्या बैठकीपूर्वी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे.
आमदारांचा ठराव पक्षश्रेष्ठींकडे पाठविला
प्रतिभा सिंह आणि सुखविंदरसिंग सुख्खू यांनी आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केल्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रत्येक आमदाराचे मत जाणून घेण्यात आले. त्यानंतर यासंदर्भातील ठराव मंजूर करून दिल्लीला पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला. आता हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.
गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांचेच नाव निश्चित
भाजपने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, पक्षाच्या संसदीय मंडळाचे ज्येष्ठ सदस्य बी. एस. येडियुरप्पा आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांची गुजरातमधील विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भूपेंद्र पटेल हे राज्याचे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाल्याने विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड ही केवळ औपचारिकता आहे.
नव्या सरकारसाठी औपचारिक राजीनामा
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शुक्रवारी त्यांच्या मंत्रिमंडळासह नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी राजीनामा दिला. पटेल यांनी गांधीनगर येथील राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला.
मुकेश अग्निहोत्रींचेही नाव आले समोर
मुकेश अग्निहोत्री यांचाही मुख्यमंत्रिपदावर दावा आहे. ते राज्याचे प्रभारी राजीव शुक्ला यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांना सुखविंदर सिंग सुख्खू यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे.
प्रतिभा सिंह म्हणाल्या...
निवडणूक वीरभद्र सिंह यांच्या नावावर लढवली गेली, त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी संधी द्यावी.