पन्ना - मध्य प्रदेशातील पन्ना इथं एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यक्रमात व्यासपीठावरच २ महिला नेत्या एकमेकींना भिडल्या. या मारहाणीत एकीने दुसऱ्या महिला नेत्याला जोरदार थप्पड लगावली. या घटनेने कार्यक्रमातील इतर सहकारी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला.
पन्ना इथं २५ व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. ज्याठिकाणी खेळाडूंना पुरस्कार देण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक खासदार वीडी शर्मा यांना मुख्य अतिथी म्हणून बोलावलं होते. या कार्यक्रमात शिवराज सरकारमधील कृषीमंत्री कमल पटेल, कामगार मंत्री बृजेद्र सिंह आणि आमदार संजय पाठक उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावरील भाजपाची एक महिला नेता खुर्चीवरून उठली आणि शेजारी बसलेल्या महिला नेत्याशी वाद घालू लागली. दोघांमधील वाद इतका टोकाला गेला की व्यासपीठावरच वादाचं रुपांतर मारामारीत झाले. बघता बघता एका महिला नेत्याने दुसऱ्या महिला नेत्याच्या कानशिलात लगावली. व्यासपीठावरील हे दृश्य पाहून काही क्षणांसाठी शांतता पसरली. या महिला नेत्यांमधील मारामारी पाहून इतर महिलांनी दोघींना सोडवण्याचा प्रयत्न केला.
पण ज्यावेळी व्यासपीठावर दोन स्थानिक महिला नेत्या एकमेकींना भिडल्या त्याच्या आधीच भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री कार्यक्रमातून निघून गेले होते. सध्या भाजपा नेते या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून आहेत. खुर्चीवर बसण्याच्या वादातून ही लढाई झाल्याचं समोर येत आहे.