गुवाहाटी - आसाममध्ये हत्तींच्या कळपाला हुसकावून लावण्यासाठी वनविभागाने केलेल्या गोळीबारात दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर त्याची आई जखमी झाली आहे. महिलेला उपचारासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी कामरूप जिल्ह्यातील बोनाडापारा परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भाताच्या शेतात हत्तींच्या कळपाने एका व्यक्तीला जखमी केले होते. यासंदर्भात स्थानिक लोकांनी वनाधिकारी आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तींचा कळप जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यासाठी हवेत गोळीबार केला. यादरम्यान घटनास्थळावरून घरी परतणाऱ्या एका चिमुकल्यासह त्याच्या आईला चुकून गोळी लागली.
स्थानिक लोक, पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचार्यांनी मुलाला आणि त्याच्या आईला बोको भागातील रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले, तर आईची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत मुलाच्या वडिलांनी सांगितले की, माझी पत्नी मुलाला घेऊन गावातील इतर लोकांसह हत्तींचा कळप पाहण्यासाठी गेली होती. तेथून परतत असताना पत्नी आणि मुलाला गोळी लागली. यानंतर, स्थानिक लोकांनी राष्ट्रीय महामार्ग-17 बराच वेळ जाम करत चौकशीची मागणी केली. यासंदर्भात, आसामचे वनमंत्री परिमल शुक्लबैद्य यांनी सांगितले की, मुलाच्या मृत्यूची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी वनविभागाचे एक उच्चस्तरीय पथक संबंधित भागात पाठवण्यात आले आहे.