नवी दिल्ली - छत्तीसगडमधील कोरबामध्ये एका दोन वर्षांच्या मुलीला तब्बल 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन देण्यात आलं आहे. एसईसीएल (SECL) कर्मचाऱ्याची मुलगी असलेल्या सृष्टी राणीला दिल्लीतील एम्समध्ये (Delhi AIIMS) डॉक्टरांनी हे इंजेक्शन दिलं. दुर्मिळ आजाराशी झुंज देत असलेल्या सृष्टीसाठी परदेशातून 16 कोटी रुपयांचं झोलजेन्स्मा इंजेक्शन (Zolgensma Injection) मागवण्यात आलं होतं. वेळेत इंजेक्शन मिळाल्यामुळे कुटुंबियांसह तिचा जीव वाचवण्याच्या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वच नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
एम्स रुग्णालयातील डॉक्टर शेफाली यांच्यासह इतर डॉक्टरांनी या प्रक्रियेत हातभार लावला. एसईसीएलच्या दीपिका प्रोजेक्टमध्ये ओव्हरमन म्हणून काम करणाऱ्या सतीश कुमार रवी यांची दोन वर्षांची मुलगी सृष्टी राणी, ही दुर्मिळ स्पायनल मस्क्युलर एट्रोफी टाइप वन (Spinal Muscular Atrophy Type One) नावाच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. तिला वाचवण्यासाठी 16 कोटी रुपयांच्या महागड्या इंजेक्शनची गरज होती. जेबीसीसीआयच्या बैठकीत सृष्टीच्या उपचारांचा खर्च कोल इंडियाने उचलावा, अशी मागणी करण्यात आली.
कोल इंडिया व्यवस्थापनाने याबाबत गांभीर्य दाखवत सृष्टीच्या उपचारांसाठी 16 कोटी रुपये देण्याची मागणी मान्य केली. मुलीचा जीव वाचवण्यासाठी दिलेल्या इंजेक्शनमुळे आता सृष्टीचे वडील सतीश कुमार रवी यांना दिलासा मिळाला आहे. तिचं संपूर्ण कुटुंबदेखील आनंदी आहे. संपूर्ण कुटुंबानं सृष्टीचा जीव वाचविण्यात योगदान देणाऱ्या दानशूर लोकांचे आभार मानले आहेत. सध्या सृष्टीची प्रकृती स्थिर असून काही दिवसांत तिला रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.