नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी भाजपला एकहाती बहुमत मिळवून दिले. ते पंतप्रधान झाल्यापासून नेहमीच त्यांच्या कामाची तुलना काँग्रेसने केलेल्या 70 वर्षांच्या कामाशी करण्यात येते. मोदींनी त्यांच्या सात वर्षांच्या कार्य काळात अनेक मोठे, धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेतले. यांत काश्मिरचे कलम 370 हटविणे, नवे कृषी कायदे, सीएए, सर्जिकल आणि एअर स्ट्राइक, जीएसटी, नोटाबंदी आणि चीन विषयक धोरण, अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे. सध्या भजपही मोदी सरकारने गत सात वर्षांत केलेल्या कार्यांचा 'लेखा-जोखा' देशासमोर मांडत आहे. याच पार्श्वभूमीवर लोकमत डॉट. कॉमने मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासंदर्भात जनमताचा कौल घेतला आहे. (2 Years of Modi 2.0: People happy with the Modi government decision about 370, but a different opinion on the agricultural laws)
पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. यासाठी या सरकारला विरोधाचा सामनाही करावा लागला. पण याची फारशी तमा या सरकारने बाळगली नाही आणि आपले काम ठरलेल्या पद्धतीप्रमाणे सुरूच ठेवले. मात्र, या सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान उभे राहिले, ते कोरोना महामारीचे. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले. मात्र, दुसऱ्या लाटेत मोदी सरकारची हतबलताही दिसून आली. मोदी सरकारच्या याच टर्ममध्ये अयोध्येतील राम मंदिराचा तिढा सुटला, काश्मीरचे कलम 370 हटले, नवे कृषी कायदे तयार झाले आणि भारत-चीन संघर्षही झाला.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात कलम 370 हटविण्याचा निर्णय आणि नवे कृषी कायदे आणण्याचा निर्णय अत्यंत चर्चेत राहिला. देशात कृषी कायद्यांविरोधात तर गेल्या वर्षभरापासून आंदोलने सुरूच आहेत. लोकमत डट कॉमने यासंदर्भात जो जनमताचा कौल घेतला, त्यात 370 कलम हटविण्याचा सरकारचा निर्णय जनतेने योग्य ठरवला. मात्र, शेतकरी धोरणासंदर्भात लोक फोरसे समाधानी नाहीत, असे दिसून आले आहे. जाणून घेऊया, काय होते लोकमत डॉट कॉमनेचे प्रश्न आणि काय आहे जनतेचा कौल...
2 Years of Modi 2.0: मोदी सरकारच्या काळात महागाई वाढली की घटली?; वाचा, काय आहे जनमताचा कौल
लोकमत डॉट कॉमने विचारलेले प्रश्न -1. 370 कलम रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य वाटतो का? -लोकमतने विचारलेल्या या प्रश्नावर तब्बल 77.45 टक्के लोकांनी 'होय', असे उत्तर दिले आहे. 14.11 टक्के लोकांनी 'नाही', असे उत्तर दिले आहे. तर 8.44 टक्को लोकांनी 'माहीत नाही', असे उत्तर दिले आहे. कलम 370 हे जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम होते. हे कलम हटवून सरकारने जम्मू आणि काश्मीरचे, जम्मू-काश्मीर आणि लडाख, अशा दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केले आहे.
2. मोदी सरकारच्या काळात भारताने चीनला धडा शिकवला, असे वाटते का? -या प्रश्नावर 46.92 टक्के वाचकांनी 'नाही', असे उत्तर दिले, 40.64 टक्के लोकांनी 'होय', असे उत्तर दिले, तर 12.44 टक्के लोकांनी 'काही प्रमाणात' धडा शिकवला, असे उत्तर दिले आहे. आपल्या दुसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारला चीनच्या आव्हानाचाही सामना करावा लागला. सरकारच्या याच कार्यकाळात गलवानमधील भारत-चीन सैन्यात हिंसक झटापट होऊन दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर आमनेसामने उभे ठाकले होते. याच काळात मोदी सरकारने चीनी व्यापार विषयक धोरनाच्या पार्श्वभूमीवरही अनेक मोठे निर्णय घेतले.
3. मोदी सरकारच्या शेतीविषयक कायद्यांविषयी तुमचे मत काय आहे? ते योग्य वाटतात का? -
लोकमत डॉट कॉमने विचारलेल्या या प्रश्नावर, 43.58 टक्के लोक 'होय' म्हणत आहेत, 47.55 टक्के लोक 'नाही' म्हणत आहेत, तर 8.87 टक्के लोक 'सांगता येत नाही' असे म्हणत आहेत.
4. राम मंदिराचे बांधकाम कधी पूर्ण होईल, असे वाटते? -लोकमतच्या या प्रश्नावर, 18.73 टक्के लोकांनी 2023 पर्यंत, 34.28 टक्के लोकांनी 2024 पर्यंत, 17.20 टक्के लोकांनी 2025 पर्यंत तर 29.79 टक्के लोकांनी 2030 पर्यंत असे उत्तर दिले आहे. मोदी सरकारच्या याच कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निकाल दिला आहे.2 Years of Modi 2.0: लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता, पण कोरोना संकट हाताळण्यात....; पाहा जनमत चाचणीचा रिझल्ट