चेन्नई : शशिकला गटाने रिसॉर्टमध्ये ठेवलेल्या अण्णा द्रमुकच्या आमदारांपैकी २0 जणांनी त्यांना डांबल्याच्या निषेधार्थ उपोषण सुरू केले आहे. याची दखल मद्रास उच्च न्यायालयाने घेतली असून, याबाबतची वस्तुस्थिती सादर करण्याचे आदेश सरकारला दिले. हा प्रकार गंभीर असल्याचे न्यायालय म्हणाले. सारे आमदार सध्या आमदार निवासामध्ये असल्याचे सरकारी वकिलांनी काल न्यायालयाला सांगितले होते. आज मात्र आमदार निवासात कोणीही आमदार नसल्याचे वकिलाने स्पष्ट केले. ते कुठे आहेत, याची कल्पना नसल्याचे सरकारी वकिलाने नमूद केले. रिसॉर्टमध्ये ठेवलेल्या आमदारांचे मोबाइल बंद करण्यात आले असून, त्यांना टीव्ही पाहायलाही बंदी असल्याचे समजते. मात्र पनीरसेल्वम गटाने मतदारांच्या माहितीसाठी सर्व आमदारांचे मोबाइल नंबर जाहीर केले आहेत. शशिकला यांच्याविरुद्धच्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होऊ नये, असा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज अमान्य केला. मात्र त्यांच्या गटातच पेचप्रसंग निर्माण झाल्याने त्या अस्वस्थ आहेत. त्यातच पनीरसेल्वम यांच्यासोबत असलेले पक्षाच्या अध्यक्ष मंडळाचे प्रमुख मधुसूदनन यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून शशिकला यांची सरचिटणीसपदी झालेली नेमणूक बेकायदा आहे आणि ती रद्द ठरविण्यात यावी, असे पत्र पाठविले. शशिकला यांनी मधुसूदनन यांची आज पक्षातून हकालपट्टी केली. मात्र त्यांना तो अधिकार नसून, मीच शशिकला यांना पक्षातून काढले आहे, असे मधुसूदनन म्हणाले. अण्णा द्रमुकचे आणखी एक ई पोन्नुस्वामी यांनीही पनीरसेल्वम यांना पाठिंबा जाहीर केला. अण्णा द्रमुकच्या पुडुच्चेरीमधील नेत्यांनीही पनीरसेल्वमना समर्थन दिले आहे. त्यामुळे शशिकला यांनी त्यांच्यापैकी काहींची पक्षातून हकालपट्टी केली. (वृत्तसंस्था)
हॉटेलात डांबलेल्या २0 अण्णा द्रमुक आमदारांचे उपोषण
By admin | Published: February 11, 2017 5:16 AM