२०... भिष्णूर... पाऊस
By admin | Published: February 21, 2015 12:49 AM
भिष्णूर परिसरात गारपीट
भिष्णूर परिसरात गारपीट पिकांचे नुकसान : शेतकरी संकटातनरखेड : तालुक्यातील भिष्णूर परिसरात शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, या परिसरात गारपीट झाल्याने संत्रा, गहू, हरभरा व आंब्याच्या बहाराचे नुकसान झाले आहे. यावर्षी खरीप पिकांनी प्रतिकूल वातावरणामुळे शेतकऱ्यांना धोका दिल्याने शेतकऱ्यांनी रबी पिकांवर आशा केंद्रीत केल्या होत्या. त्यातच शुक्रवारी दुपारी भिष्णूर, थाटूरवाडा, खुशालपूर, नायगाव (धोटे), विवरा या शिवारात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यातच बोराच्या आकाराची गारपीट झाल्याने या शिवारातील गहू, हरभरा, संत्र्याचा अंबिया बहार, कपाशी, तूर या पिकांसह आंब्याच्या बहाराचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शासनाने योग्य नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य सतीश रेवतकर, सरपंच प्रभा काचेवार, योगेश कळंभे, प्रदीप नासरे, जिजा रेवतकर, अनुसया नासरे, वेणू रेवतकर, दिनेश कडू, अमोल तिवारी, मोहन निंबाळकर, चिंटू धोटे, बाबू खरपकर, किशोर ठाकरे, ओमप्रकाश काळमेघ यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, तालुक्यातील लोहारीसावंगा, जलालखेडा, खैरगाव, खरसोली या परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. काटोल व कळमेश्वर तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, कुठेही पावसाच्या सरी कोसळल्याची नोंद नाही. ***