रतलाम : मध्य प्रदेशमधील शालेय विद्यार्थ्यांना भारत माता की जय घोषणा देणं चांगलंच महागात पडलं आहे. येथील रतलाम जिल्ह्यातील एका कॉन्व्हेंट शाळेतील 20 विद्यार्थ्यांची 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्यामुळे शाळा प्रशासनानं हकालपट्टी केल्याचं वृत्त आहे. इतकंच नाही तर त्यांना परीक्षा देण्यासही परवानगी नाकारण्यात आली.
रतलाममधील नामली येथे सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेतील ही घटना आहे. शुक्रवारी इयत्ता नववीत शिकणा-या विद्यार्थ्यांनी शाळेत 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर शाळा प्रशासनाने 20 विद्यार्थ्यांना शाळेतून हाकललं आणि परीक्षा देण्यासही मज्जाव केला.
या प्रकारामुळे संतापलेले विद्यार्थ्यांचे पालक शाळेविरोधात पोलीस स्थानकाजवळ जमा झाले. पण नंतर हे प्रकरण मिटविण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पालकांनी नरमाईची भूमिका घेतल्याची माहिती आहे. पण या संपूर्ण घटनेबाबत शाळा प्रशासनाने मौन धारण केलं आहे.