ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - अफगाणिस्तानमधील इसिसच्या तळांवर अमेरिकेने गुरुवारी केलेल्या शक्तिशाली बॉम्बहल्ल्यात 36 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यामध्ये केरळमधून इसिसमध्ये भरती झालेल्या तरुणाचाही समावेश आहे. याशिवाय यामध्ये अन्य 20 भारतीयांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमेरिकेने जेव्हा अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतात इसिसला लक्ष्य करताना जीबीयू-43/बी मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट (एमओएबी) हा महाशक्तिशाली बॉम्ब टाकला त्यावेळी हे भारतीय त्याच परिसरात उपस्थित होते, त्यामध्ये महिलांसोबत लहान मुलांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी केरळमधून 21 जण बेपत्ता झाले होते, ते अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी संघटना आयसिसमध्ये सहभागी झाले होते, असं वृत्त होतं. अमेरिकेने जेव्हा बॉम्ब हल्ला केला त्यावेळी हे 21 जणंही त्याठिकाणी उपस्थित होते त्यामुळे त्यांचाही यामध्ये मृत्यू झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यातील मुर्शीद मोहम्मद याचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे समजते. अफगाणिस्तानमधील माजीद पुरयील नामक तरुणाने केरळमधील सामाजिक कार्यकर्त्याला टेलिग्रामवरुन मेसेज पाठवून मुर्शीदच्या मृत्यू झाल्याची माहिती दिली.
Kerala:Family of one of 21 missing Kerala youths(who allegedly joined ISIS)say he(Murshid)was killed in MOAB strike in Afghanistan yesterday— ANI (@ANI_news) April 14, 2017