पाटणा : बिहारच्या माध्यमिक शाळा परीक्षेत टॉपर्सच्या यादीत आलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २0 लाख रुपये घेतले होते, असे बिहार एसएससी बोर्डाचे अध्यक्ष लालकेश्वर प्रसाद सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले आहे, तसेच माध्यमिक शाळांना मान्यता देण्याच्या बदल्यात प्रत्येकी ४ लाख रुपये घेतले होते, हेही त्यांनी मान्य केले आहे.नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ पास करण्याचाच नव्हे, तर गुणवत्ता यादीत पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर आणण्याचा पराक्रम बिहारच्या एसएससी बोर्डाने करून दाखवला होता. या विद्यार्थ्यांच्या मुलाखती एका वृत्तवाहिनीने घेतल्या, तेव्हा त्यांना साध्या व सोप्या प्रश्नांची उत्तरेही देता येत नसल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर, बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागताच, लालकेश्वर प्रसाद सिंग व त्यांची पत्नी माजी आमदार उषा सिन्हा हे अटक टाळण्यासाठी फरार झाले होते. त्यांना बिहार पोलिसांनी वाराणशीमधून अटक केली असून, ते दोघे कोठडीत आहेत. आपल्या काळात आपण ४00 माध्यमिक शाळांना मान्यता दिली होती आणि प्रत्येक शाळेच्या मान्यतेसाठी ४ लाख रुपये घेतले होते, असे लालकेश्वर प्रसाद सिंग याने पोलिसांना सांगितले. (वृत्तसंस्था)
टॉपर्स बनविण्यासाठी घेतले २0 लाख रुपये
By admin | Published: June 24, 2016 12:23 AM