नवी दिल्ली - बिहारच्या राजकारणात मंगळवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. विधानसभेत जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कक्षात राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यात तब्बल 20 मिनिटं राजकीय चर्चा झाली. त्यामुळे बिहारचे राजकारण तापले आहे. भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
तेजस्वी-नितीश कुमार यांच्या भेटीनंतर बिहारमध्ये एनआरसी लागू न करण्यावर आणि 2010 च्या नियमांनुसार एनपीआर सभागृहात सर्वसंमतीने पास करून घेण्यात आला आहे. तब्बल तीन वर्षानंतर नितीश कुमार आणि तेजस्वी यांच्यात बैठक झाली. यावेळी आरजेडीचे नेते अब्दुल सिद्धीकी आणि काँग्रेस आमदार अवधेश नारायण सिंह उपस्थित होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी तीनही नेत्यांसमोर आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तेजस्वी यांनी देखील नितीश कुमारांना एनपीआरसह एनआरसीविरुद्ध प्रस्ताव पास करण्याचा सल्ला दिला. यावर नितीश कुमारांनी ताबडतोब संमती दिली. त्यानंतर नितीश कुमारांनी दोन्ही प्रस्ताव विधानसभेत पारित केले.
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार ?नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्या भेटीने पुन्हा एकदा काका-पुतणे एकत्र येणार असं चित्र बिहारमध्ये निर्माण झाले आहे. नितीश कुमार देखील एनआरसीवरून नाराज आहेत. मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावतील, अशी त्यांना भिती आहे. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. तसेच प्रस्ताव मंजूर करून नितीश कुमारांनी आपण भाजपसोबत असलो तरी मुस्लिमांच्या अधिकारासाठी तत्पर असल्याचा मॅसेज दिला.
भाजपमध्ये नाराजीभाजपचे मंत्री विनोद सिंह, विजय सिन्हा आणि प्रेम कुमार यांनी दबक्या स्वरात नितीश कुमार यांच्या प्रस्तावावर असहमती दर्शविली. तर भाजप आमदार मिथिलेश तिवारी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह एनआरसीवर जो निर्णय घेतील, तो मान्य राहिल. मात्र भाजपला एनआरसीपेक्षा तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांची भेट त्रासदायक वाटत आहे.