उमरिया : आपल्या १५ महिन्यांच्या मुलाला वाचविण्यासाठी आईने पट्टेदार वाघाशी तब्बल २० मिनिटे झुंज दिली. वाघाची नखे छाती चिरून थेट फुफ्फुसापर्यंत घुसली तरीही तिने हिंमत सोडली नाही. अखेर तिने मुलाला वाघाच्या जबड्यातून सोडवले. मध्य प्रदेशच्या उमरिया जिल्ह्यातील रोहनिया ज्वालामुखी गावातील ही घटना आहे. मुलाला रुग्णालयात दाखल केले आहे. महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला जबलपूरला हलविले आहे. मुलाची प्रकृती मात्र धोक्याबाहेर आहे.
रोहनिया ज्वालामुखी हे गाव बांधवगड व्याघ्र प्रकल्पाला खेटून आहे. येथील रहिवासी भोला चौधरी यांच्या पत्नी अर्चना रविवारी सकाळी मुलगा राजवीरला शौचासाठी जवळच्या पडीक जागेत घेऊन गेल्या होत्या. तेव्हा झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने कुंपण ओलांडून आत येऊन मुलाला जबड्यात पकडले. त्यावेळी अजिबात घाबरून न जाता मुलाला वाचविण्यासाठी अर्चना वाघासमोर उभ्या ठाकल्या. वाघाशी त्यांनी झुंज दिली. या झटापटीत वाघाची नखे त्यांच्या फुफ्फुसापर्यंत घुसली. मात्र, त्यांनी हार मानली नाही. जवळपास २० मिनिटे त्यांची झुंज सुरू होती. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आसपासच्या वस्तीतील लोक लाठ्याकाठ्या घेऊन धावले. त्यांना पाहून वाघ पळून गेला.
आई गंभीर, मुलाची प्रकृती धोक्याबाहेरजिल्हा रुग्णालयात तपासणीनंतर महिलेची मान मोडल्याचे समोर आले. प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला तातडीने जबलपूर येथे हलविले आहे. महिलेच्या पाठीवरही नखांचे खोल घाव होते. टाके घातल्यानंतरही रक्तस्राव थांबत नव्हता. मुलाच्या डोक्याला इजा झाली आहे. मात्र, त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एन. रूहेला यांनी सांगितले.