गुजरातमधील सुरतमध्ये ब्रेन डेड घोषित करण्यात आलेला 20 महिन्यांचा मुलगा ऑर्गन डोनर बनला आहे. या मुलाची किडनी, लिव्हर आणि दोन्ही डोळे दान केल्याने आणखी पाच मुलांना जीवनदान मिळालं आहे. सुरतच्या डोनेट लाइफ संस्थेने अवयवदानाची प्रक्रिया पार पाडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वीरपूर मंदिराजवळ राहणारा यश अजयकुमार गज्जर, हा एका खासगी बँकेत काम करतो. 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचा 20 महिन्यांचा मुलगा रियांश घराच्या पहिल्या मजल्यावरून पडला होता. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर रियांशला अमर चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान 1 जानेवारी रोजी डॉक्टरांनी 20 महिन्यांच्या रियांशला ब्रेन डेड घोषित केलं.
रियांशच्या कुटुंबीयांनी यानंतर सुरतच्या डोनेट लाइफ संस्थेचे नीलेश भाई मांडलेवाला यांच्याशी संपर्क साधून ब्रेन डेड घोषित झालेल्या मुलाचे अवयव दान केले. अवयवदान करण्यापूर्वी कुटुंबीयांनी विचार केला की, आपलं मूल नसेल तर त्याचे अवयव कुणाला तरी दान करून नवीन जीवन मिळू शकतं. त्याच्या अवयवांनी तो इतरांच्या शरीरात पुन्हा जिवंत होईल.
माहितीनंतर डोनेट लाइफ संस्थेची टीम हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि रियांशचे वडील यश गज्जर, आई ध्वनी गज्जर, आजोबा अजय गज्जर आणि आजी मेघनाबेन गज्जर आणि कुटुंबातील इतर सदस्यांना अवयवदानाशी संबंधित प्रक्रिया समजावून सांगितली. कुटुंबीयांच्या संमतीनंतर अवयवदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
डोनेट लाइफने SOTTO शी संपर्क साधला. SOTTO यांनी दोन्ही किडनी अहमदाबादच्या IKRDC ला दान केल्या. याशिवाय ROTTO मुंबई तर्फे नानावटी हॉस्पिटल, मुंबईला लिव्हर दान करण्यात आले. कुटुंबाने हृदय आणि फुफ्फुस दान करण्यास संमती दिली होती, परंतु ब्रेन डेड रियांश या रक्तगटाच्या लहान मुलांची नावे हृदय आणि फुफ्फुसासाठी नोंदणीकृत नव्हती. त्यामुळे देणगी प्रक्रिया झाली नाही.