ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - श्रीनगरमधील पोलीस अधिकारी मोहम्मद आयुब पंडित यांना मारहाण करुन निर्दयीपणे हत्या केल्याप्रकरणी जवळपास 20 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. गेल्या महिन्यात 22 जून रोजी जमावाने मशिदीबाहेर मोहम्मद आयुब पंडित यांची बेदम मारहाण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर खळबळ उडाली होती, आणि तणावही निर्माण झाला होता. अजून काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी दिली आहे.
"पोलीस उपअधीक्षक आयुब पंडित यांची निर्दयीपणे हत्या करणं खूपच गंभीर प्रकार होता. काश्मीर खो-यात अशा प्रकारची घटना होण्याची ही पहिलीच वेळ होती", असं मुनीर खान यांनी सांगितलं आहे. "या प्रकरणाचा अत्यंत वेगाने आणि परिणामकारक तपास सुरु आहे", असंही ते बोलले आहेत.
आरोपींमध्ये एक हिजबूल मुजाहदिद्दीनचा दहशतवादी साजिद अहमद गिलकरदेखील होता. महिन्याच्या सुरुवातीला सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत तो ठार झाला. 12 जुलै रोजी साजिद अहमद आणि त्याचे साथीदार आकिब गुल आणि जावेद अहमद शेख यांचा सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला होता. रात्रभर ही चकमक सुरु होती.
"पोलीस अधिकारी मोहम्मद आयुब पंडित यांची हत्या करण्यामध्ये साजिद अहमद गिलकरने महत्वाची भूमिका बजावली", अशी माहिती पोलीस प्रवक्त्याने दिली होती.
रमजानच्या महिन्यातील शेवटचा शुक्रवार लक्षात घेता मशिदीबाहेरच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. तिथे कोणताही अनुचित प्रकार घडायला नको यासाठी पोलिसही गस्त घालत होते. यावेळी जामिया मशिदमध्ये "शब-ए-कद्र"ची प्रार्थना सुरू होती. रमजानमधील नमाज पठण असल्यानं खबरदारी म्हणून मशिदींबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तिथे पोलीस उपअधीक्षक मोहम्मद अयुब पंडितही तैनात होते. मध्यरात्रीच्या आसपास जमलेल्या जमावाने पाकिस्तान जिंदाबाद आणि अल-कायदा ऑपरेटिव्ह झाकीर मुसाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु केली.
मोहम्मद अयुब पंडित व्हिडीओ काढत असल्याने काहीजणांनी त्यांच्यासोबत हुज्जत घातली. मोहम्मद अयुब पंडित यांनी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येतात त्यांनी हवेत गोळीबार केला. त्यात ३ लोक जखमी झाले. त्यानंतर जमावाने पोलीस उपअधीक्षक पंडित यांच्यावर हल्ला चढवला, आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.