शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सोमवारी लोकसभेत सगळ्यात कमी वेळेत प्रश्नोत्तराचे सर्व कामकाज संपवण्याचा विक्रम स्थापन झाला पण लाजिरवाणा. ज्या सदस्यांना प्रश्न विचारायचे होते त्यातील बहुतेक गैरहजर होते. जे पूरक प्रश्न विचारणार होते ते गदारोळात गुंतले होते. जेव्हा प्रश्नोत्तर तासात यादीतील सर्व २० प्रश्न संपवले गेले तेव्हा १५ मिनिटे शिल्लक होती. यामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित केले गेले. प्रश्नोत्तर तासात २० निवडक प्रश्नांशी संबंधित पूरक प्रश्नांना संबंधित मंत्री सभागृहात तोंडी उत्तर देतात. सोमवारी ज्या २५ सदस्यांची नावे यादीत होती त्यातील फक्त ४ जण सभागृहात हजर होते. १६ प्रश्नांशी संबंधित २० सदस्य गैरहजर होते.
४५ मिनिटांत एकूण १३ पूरक प्रश्नच विचारले गेले. त्यातील निम्मे पूरक प्रश्न ज्यांचे नाव यादीत नव्हते त्यांनी विचारले होते. गौरव गोगोई यांनी यादीतील आपल्या प्रश्नाशी संबंधित प्रश्न विचारल्यानंतर गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या हकालपट्टीची मागणी केली. भाजपने आपल्या १०० पेक्षा जास्त खासदारांना निवडणुकीचे काम दिले असून विरोधी पक्षांतील बहुतेक सदस्य सभापतींसमोरील मोकळ्या जागेत विरोध प्रदर्शन करत होते.संसदेच्या इतिहासात आतापर्यंत दोन वेळा प्रश्नोत्तर तासात सर्व २० प्रश्न निकाली निघाले. १९७२ मध्ये पहिल्यांदा असे झाले होते. १७ व्या लोकसभेत २७ नोव्हेंबर, २०१९ रोजी २० प्रश्न घेतले गेले. तेव्हा तो तास एक तास चालला आणि सदस्य इतक्या मोठ्या संख्येने गैरहजर नव्हते.
...आणि नियम बदलला गेला
यूपीए-२ दरम्यान एकदा सदस्यांच्या गैरहजेरीमुळे प्रश्नोत्तर तास स्थगित करावा लागला होता. मीरा कुमार सभापती असताना ज्या २६ खासदारांचे नाव प्रश्नोत्तर तासात वेगवेगळ्या प्रश्नांसाठी यादीत होते त्यातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. तेव्हा नियम हा होता की, ज्या सदस्याचे नाव यादीत आहे त्याच्या गैरहजेरीत त्याच्याशी संबंधित पूरक प्रश्न विचारले जाऊ शकत नाहीत. या घटनेनंतर नियम बदलला गेला आणि हे ठरले की, संबंधित सदस्याच्या गैरहजेरीतही त्या प्रश्नाशी संबंधित पूरक प्रश्न घेतले जाऊ शकतात.