कोलकाता - झारखंडनंतर आता पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम न बोलणाऱ्या 20 वर्ष युवकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. इतकचं नाही तर जय श्रीराम म्हटलं नाही म्हणून कोलकाताच्या पार्क सर्कस स्टेशनवर चालत्या लोकल ट्रेनमधून धक्का मारून बाहेर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकारदेखील घडला. पिडीत शाहरुख हलदर असं या युवकाचं नाव आहे.
शाहरुखचा जीव वाचला असला तरी त्याची परिस्थिती नाजूक आहे. मदरशामध्ये काम करणाऱ्या शाहरुखने दावा केला आहे की, तो दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातून हुगली येथे प्रवास करत होता. त्यावेळी एका गटाने त्याला जय श्रीराम बोललो नाही म्हणून चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं. हाफीद मोहम्मद शाहरुख हलदरने ट्रेनमधील त्या टोळक्याने त्याला मारहाणही केली. ट्रेनमधील कोणी मला वाचविण्यासाठी पुढे आलं नाही. जेव्हा या टोळक्यांनी ट्रेनमधून बाहेर ढकललं त्यावेळी स्थानिक लोकांनी मला मदत केली.
मिडीया रिपोर्टनुसार घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रेनमध्ये चढण्यावरुन शाहरुख आणि आरोपींचा वाद झाला होता. या घटनेचा तपास सुरु आहे. अद्याप यामध्ये कोणालाही अटक केली नाही. तक्रारकर्त्याचा आरोप आहे की हे युवक हिंदू संहिता रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी कोलकाता येथे आले होते.
VIDEO: जय श्रीराम म्हणण्याची सक्ती करत जमावाची मारहाण; तरुणाचा मृत्यू
हिंदूत्ववादी संघटनेने आरोप फेटाळलेशाहरुख ट्रेनमध्ये आपल्या सीटवर बसलेला तेव्हा कॅनिंग स्टेशनवर काही युवक ट्रेनमध्ये चढले. शाहरुख हलदरने सांगितले की, या युवकांमधील काहीजण माझ्याकडे आले, त्यावेळी ट्रेन धकुरिया स्टेशनजवळ पोहचलेली. त्यांनी माझ्या पेहरावावर प्रश्न उपस्थित केले आणि मला जय श्रीराम म्हणण्यास सांगितले. जेव्हा मी त्यांना नकार दिला तेव्हा त्यांनी मला मारहाण करण्यात सुरुवात केली. मात्र शाहरुखने केलेले आरोप हिंदू संहिता संस्थेने फेटाळून लावले आहेत.
दोन दिवसांपूर्वी झारखंडमधील खारसावन जिल्ह्यातही असाच प्रकार घडला. एका तरुणाला कित्येक तास बेदम मारहाण करण्यात आली होती. मात्र गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. या तरुणाला झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यात त्याला जय श्रीराम म्हणण्यास सांगितलं जात होतं.