गेल्या काही वर्षांमध्ये टीव्हीच्या तंत्रज्ञानामध्ये व्यापक असे बदल झाले आहेत. स्मार्टफोन्सनंतर आता स्मार्ट टीव्हीचा काळ सुरू झाला आहे. या टीव्हींवर तुम्ही यूट्युब, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम यांसह अनेक अॅपचा अॅक्सेस मिळवू शकता. मात्र असं असलं तरी आजही देशातील मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या सेट टॉप बॉक्सचा वापर करते. फ्री टू एअर चॅनेलसाठीही ग्राहक सेट टॉप बॉक्ससाठी पैसे मोजत असतात.
येणाऱ्या काळात तुम्हाला हे चॅनेल्स पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स खरेदी करण्याची आवश्यकता भासणार नाही. सरकारने त्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. ग्राहकांना सेट टॉप बॉक्सपासून मुक्तता मिळवून देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका योजनेवर काम सुरू केले आहे.
त्यानुसार टीव्हीवर आधीपासूनच इन-बिल्ट सॅटेलाइट ट्युनर लावलेला असेल. त्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, सुमारे २०० टीव्ही चॅनेल मोफत आहेत. जे प्रेक्षक कुठलेही पैसे खर्च न करता पाहू शकतात. टीव्हीमध्ये बिल्ट इन सॅटेलाइट ट्युनर मिळाल्याने युझर्स कुठल्याही अडचणीविना फ्री-टू एअर चॅनेल पाहू शकतील. त्यासाठी त्यांना एक अँटिना लावावा लागेल. त्यामधून टीव्हीपर्यंत सिग्नल पोहोचेल.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, दूरदर्शनच्या फ्री डीशवर सामान्य एंटरटेन्मेंट चॅनलची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची संख्याही वाढली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या विभागाने केलेल्या प्रयत्नांबाबतही माहिती दिली. ज्यामुळे इन बिल्ट ट्युनरसह टीव्हीची विक्री होऊ शकेल. सध्या दूरदर्शन आपले चॅनल्स अॅनालॉग ट्रान्समिशनवरून डिजिटल सॅटेलाइट ट्रान्समिशनवर स्विच करत आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, टीव्हीमध्ये इन बिल्ट ट्युनर मिळाल्याने २०० हून अधिक चॅनल्स केवळ एका क्लिकवर पाहू शकतील. मात्र त्यांनी हेही सांगितले की, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र सरकारच्या या प्लॅनमध्ये विविध डीटीएच सेवांवर दिसणारे चॅनल दिसणार नाहीत. तर जे फ्री टू एअर आहेत, असे चॅनल पाहता येतील.