कोलंबो - जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना रविवारी (21 एप्रिल) श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 359 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 500 पेक्षा अधिक जण जखमी झाले. तर, या हल्ल्यात जवळपास 200 चिमुकल्यांनी आपले नातेवाईक गमावले आहेत. त्यामध्ये अनेकांनी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला गमावले.
श्रीलंकेतील एका प्रसिद्ध चॅरिटी संस्थने याबाबत माहिती दिली. या हल्ल्यात कित्येक कुटुबांनी त्यांच्या घरातील कर्ता व्यक्ती गमावला आहे. तर अनेक कुटुंबांकडे बचतीचे पैसेही उरले नसून आता उदरनिर्वाहासाठीही साधनसामुग्री नसल्याचे कोलंबोतील श्रीलंका रेड क्रॉस सोसायटीने म्हटले आहे. श्रीलंकेतील या स्फोटानंतर संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस, लष्कर सज्ज असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. श्रीलंकेत ज्या दहशतवादी गटाने स्फोट घटवले त्याच गटातील काही दहशतवाद्यांचा कोलंबो शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांसह महत्त्वाचे पूल पुन्हा उडवून देण्याचा कट असल्याचे सरकारने म्हटले आहे. इसिसशी संबंधित नॅशनल तौहिद जमात या दहशतवादी गटाने श्रीलंकेत बॉम्बस्फोट उडवले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहिम सुरू केल्या आहेत.
या बॉम्ब हल्ल्यामुळे जवळपास 75 कुटुंबीय उद्धवस्त झाली आहेत. तर 500 जण जखमी झाले असून त्यांपैकी अनेकांना अपंगत्व आल्याने ते काम भविष्यात करू शकणार नाहीत, असेही वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. या हल्ल्यात अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले आहेत. मोठा मानसिक आघात या कुटुबीयांवर झाला आहे. त्यामुळे या पीडितांना मानसिक प्राथमोपचाराची गरज आहे, असेही एसएलआरसीएसने म्हटले आहे. या कुटुंबांना आता नवीन आव्हानांचा सामना करायचा आहे. त्यामुळे या पीडितांच्या पाठीशी सामाजिक संस्थांनी उभे राहणे त्यांना धीर देणे गरजेचे आहे. तसेच, शक्य झाल्यास हल्ल्यात अनाथ झालेल्या चिमुकल्यांचे पालकत्वही स्विकारणे गरजेचे असल्याचे संस्थेने म्हटले आहे.