"...हीच मोदींची गॅरंटी", काँग्रेस खासदाराकडे २०० कोटींचं घबाड; पंतप्रधानांची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 02:34 PM2023-12-08T14:34:52+5:302023-12-08T14:35:27+5:30

झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली.

 200 crore cash was found in raids conducted by Congress Rajya Sabha MP Dheeraj Sahu in Jharkhand at 10 places and Prime Minister Narendra Modi has criticized this | "...हीच मोदींची गॅरंटी", काँग्रेस खासदाराकडे २०० कोटींचं घबाड; पंतप्रधानांची सडकून टीका

"...हीच मोदींची गॅरंटी", काँग्रेस खासदाराकडे २०० कोटींचं घबाड; पंतप्रधानांची सडकून टीका

झारखंडमधीलकाँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली. दहा ठिकाणी मारलेल्या छापेमारीत २०० कोटींची रक्कम मिळाली आहे. आयकर विभागाने बुधवारी तीन राज्यांतील त्यांच्या अर्धा डझन ठिकाणांवर छापे टाकले. आयकर विभागाने झारखंड आणि ओडिशातील बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर (मद्य उत्पादन कंपनी) छापा टाकला आणि कंपनीशी संबंधित मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूर आणि झारखंडमधील रांची आणि लोहरदगामध्ये ही कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

पंतप्रधानांनी म्हटले, "देशातील जनतेने चलनी नोटांचे हे ढिगारे पाहावेत आणि मग त्यांच्या नेत्यांची प्रामाणिक 'भाषणे' ऐकावीत. जनतेकडून जे काही लुटले गेले आहे, त्याचा एक-एक पैसा परत करावा लागेल, ही मोदींची गॅरंटी आहे." दरम्यान, बलदेव साहू आणि ग्रुप ऑफ कंपनीजच्या सातपुडा कार्यालयात ९ ऑफिसमध्ये ५००, २०० आणि १०० रूपयांच्या नोटांचा ढीग सापडला.

दरम्यान, खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होती. काँग्रेस नेत्याच्या घरांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने आयकर विभागाच्या पथकाला मशीनद्वारे नोटा मोजाव्या लागत आहेत. बुद्धिस्ट डिस्टिलरी ही राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या कुटुंबाची कंपनी आहे. त्यांचे कुटुंब दारू व्यवसायाशी निगडीत आहे. ओडिशात त्यांचे अनेक दारू निर्मितीचे कारखाने देखील आहेत. हा व्यवसाय संयुक्त कुटुंबाच्या पाठिंब्यावर चालवला जातो. माहितीनुसार, २०० कोटी रुपयांची रोकड सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. आयकर विभागाने झारखंडमधील बोलंगीर आणि ओडिशातील संबलपूर येथील धीरज साहू यांच्या वडिलोपार्जित घरावर छापे टाकले आहेत.

खासदार धीरज साहू कोण आहेत?

मागील काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात असलेले धीरज साहू हे काँग्रेसचे नेते आहेत. ते झारखंडमधून राज्यसभेचे खासदार आहेत. धीरज साहू हे उद्योगपती आहेत. धीरज साहू यांचे बंधू शिवप्रसाद साहू हे देखील खासदार होते. धीरज यांचे कुटुंब स्वातंत्र्यापासून काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे. धीरज साहू यांनी १९७७ मध्ये राजकारणात प्रवेश केला. १९७८ च्या जेलभरो आंदोलनात ते तुरुंगातही गेले होते. जून २००९ मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले. धीरज सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. २०२० मध्ये धीरज प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निवडणुकीशी संबंधित याचिका फेटाळली होती. भाजपाचे उमेदवार प्रदीप सोथनालिया यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते. २०१८ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रदीप सोनथालिया यांनी धीरज साहू यांना राज्यसभेत आव्हान दिले होते.

Web Title:  200 crore cash was found in raids conducted by Congress Rajya Sabha MP Dheeraj Sahu in Jharkhand at 10 places and Prime Minister Narendra Modi has criticized this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.