शंभू बॉर्डरवर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शनिवारी २०० दिवस पूर्ण झाले. शंभू बॉर्डरवर आंदोलनाला २०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेतकरी मोठ्या संख्येने जमले असून आणखी मोठं आंदोलन करण्याचं नियोजन करत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात महिला कुस्तीपटू विनेश फोगाटही सहभागी झाली आहे.
शेतकऱ्यांच्या या मोठ्या आंदोलनात विनेश फोगाटचा शेतकऱ्यांकडून गौरव करण्यात आला आहे. आंदोलन शांततेत पण तीव्रतेने सुरू असल्याचं शेतकरी नेते सरवन सिंह पंधेर यांनी सांगितलं. केंद्र सरकार त्यांच्या संकल्पाची परीक्षा घेत असून त्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत, असंही ते म्हणाले.
पंधेर यांनी आज तकला सांगितलं की, आम्ही पुन्हा एकदा सरकारसमोर आमच्या मागण्या मांडू आणि नव्या घोषणाही केल्या जातील. त्याचबरोबर बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौतवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाला कंगनाच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे.
आगामी हरियाणा निवडणुकीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या रणनीतीचे खुलासे करण्याचे संकेतही दिले आहेत. राज्याच्या राजकीय पटलावर सक्रिय भूमिका बजावण्याच्या आपल्या इराद्यावर जोर देत येत्या काही दिवसांत त्यांची पुढील वाटचाल जाहीर करण्याची त्यांची योजना आहे.
पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना दिल्लीकडे मोर्चा काढण्यापासून रोखल्यानंतर १३ फेब्रुवारीपासून शेतकरी शंभू बॉर्डरवर ठाण मांडून आहेत. आंदोलक इतर प्रमुख मुद्द्यांसह सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) ची कायदेशीर गॅरंटी देण्याची मागणी करत आहेत.