ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - गेल्यावर्षी ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्यानंतर आता सरकारने २०० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारच्या आदेशानंतर रिझर्व्ह बँकेने या नोटेची छपाई सुरू केली आहे. त्यामुळे ही नोट लवकरच चलनात येण्याची शक्यता आहे.
दैनंदिन व्यवहारात देवाणघेवाण सोपी व्हावी म्हणून ही नोट चलनात आणण्यात येत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने दिले आहे. नव्या नोटा चलनात आणण्यासाठी काम पाहत असलेल्या दोन व्यक्तींनी सांगितले की रिझर्व्ह बँकेने काही आठवड्यांपूर्वीच नोटांच्या छपाईसाठी आदेश दिले होते. त्यानंतरच सरकारी छापखान्यांमध्ये या नोटांच्या छपाईचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, सरकार २०० रुपयांची नोट चलनात आणणार असल्याचे वृत्त याआधीच प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी ही नोट जुलै महिन्यात चलनात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता ही नोट चलनात येण्यास काही उशीर होण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारने काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. दरम्यान, मार्चमध्ये झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या बैठकीत २०० रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या नोटांमुळे कमी किमतीच्या नोटांचा चलनामध्ये तुटवडा जाणवणार नाही. दरम्यान, २०० रुपयांच्या नोटा सुरक्षेच्या दृष्टीने अधिक अद्ययावत असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.