श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश मिळालं आहे. या वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवानांनी विविध दहशतवादी संघटनांच्या तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती मिळत आहे. 2019 मध्ये 157 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. या वर्षभरात खात्मा करण्यात आलेल्या अनेक दहशतवाद्यांमध्ये टॉप कमांडर्सचा समावेश होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये एप्रिल महिन्यात 28 दहशतवादी मारले गेले. तर जुलै आणि ऑक्टोबरमध्ये 21 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तसेच दक्षिण काश्मीरमध्ये सर्वाधिक चकमकी झाल्या. ज्यामध्ये ऑक्टोबरपर्यंत 138 दहशतवादी मारले गेले. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी 200 मधील 190 दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये खात्मा झाल्याचं म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात अत्यंत वेगाने सर्च ऑपरेशन्स सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या जॉईंट ऑपरेशनमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले. हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडरचा (Hizbul Mujahideen Chief Commander) खात्मा करण्यात आला. सैफुल्लाह असं दहशतवाद्याचं नाव आहे. सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांना श्रीनगरच्या रंगरेथ परिसरात हिज्बुल मुजाहिद्दीनचे दोन टॉप दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांची एसओजी आणि सीआरपीएफच्या जवानांनी एक जॉईंट ऑपरेशन सुरू केले. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले.
हिज्बुल मुजाहिदीनच्या टॉप कमांडरचा खात्मा, एकाला अटक
जॉईंट ऑपरेशनमध्ये हिज्बुलचा टॉप कमांडर सैफुल्लाह उर्फ गाजी हैदरचा खात्मा करण्यात यश आलं आहे. जम्मू-काश्मीर आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ऑपरेशन दरम्यान सैफुल्लाह नावाच्या एका कमांडरचा खात्मा केला आहे. त्याची ओळख पटवण्यात येत आहे. मात्र तो 95 टक्के सैफुल्लाह असल्याची आमची खात्री आहे. तसेच एका दहशतवाद्यालाही अटक करण्यात आली आहे.