तुम्ही कुठलंही सामान ऑनलाइन ऑर्डर केलं आणि त्यानंतर तुमच्याजवळ ते सामान डिलिव्हर झाल्यावर त्या सामानामधून एक दोन हजार रुपयांची नोट सापडली तर... तर तुम्ही निश्चितच आनंदित व्हाल. अशा प्रकारे नोट मिळणे कुणाला आवडणार नाही. मात्र ती नोट निरखून पारखून पाहिल्यावर ती नोट बनावट असल्याचे तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे तुम्ही नाराज व्हाल. असाच प्रकार गेल्या काही दिवसांपासून लाखो लोकांसोबत घडला आहे. हे काम केलंय ग्रोसरी डिलिव्हरी वेबसाइट असलेल्या स्विगी इन्स्टामार्टने.
स्विगीने या दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा एका वेबसिरिजच्या प्रमोशनसाठी पाठवल्या. आता या वेबसिरिजचं नाव तुम्हाला कळलंच असेल. तर त्या वेबसिरीजचं नाव आहे ‘फर्जी’. ही वेबसिरीज अॅमेझॉन प्राइमवर प्रसारित होत आहे. या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी शाहीद कपूर आणि विजय सेतुपती यांचे फोटो असलेल्या बनावट नोटा लोकांना पाठवल्या आहेत. फर्जीामध्ये शाहीद कपूर आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेमध्ये आहे.
या वेबसिरीजचे कथानक हे बनावट नोटांवर आधारित आहे. या शाहिद कपूर बनावट नोटा बनवणाऱ्या व्यक्तीचं पात्र साकारत आहे. तर विजय सेतुपती एक अधिकारी आहे. स्विगीचे मार्केटिंग हेड आशिष लिंगमनेनी यांनी सांगितले की, प्राइम व्हिडीओसोबत काम करणं एक रोमांचक अनुभव होता. त्यांनी सांगितले की, आम्ही स्विगी इन्स्टामार्टच्या ऑर्डर्ससोबत एक बनावट नोट पाठवली आहे, जेणेकरून आमच्या शोबाबत अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवता येईल. या कल्पनेने हजारो इन्सटामार्ट युझर्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. आम्हाला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे.