हैदराबाद : तेलंगणा राज्य संग्रहालयातील दोन हजार वर्षांपेक्षाही जुन्या इजिप्शियन ममीला नष्ट होण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू असून पुरातत्त्व आणि संग्रहालय विभागातर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार नष्ट होत असलेल्या ममीसाठी भारतात प्रथमच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. यामध्ये सीटी स्कॅन आणि एक्सरे चाचणीचाही समावेश आहे. १९२० साली सहावा निजाम मीर महबूब अली खान यांना ही ममी मिळाली होती. त्यांचे पुत्र आणि अखेरचे निजाम मीर उस्मान अली खान यांनी पुढे ही ममी संग्रहालयाच्या सुपूर्द केली. १९३० पासून ती संग्रहालयात आहे. युवा विकास, पर्यटन न संस्कृती विभागाचे सचिव बी. व्यंकटेशम यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांना यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, स्कॅनिंग केल्यावर ही ममी सुमारे २५ वर्षांच्या तरुणीची असून तिची लांबी १३६ सेंटीमीटर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ममीच्या बचावासाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा प्रयोग भारतात एखादी ममी अथवा मानवी अवशेषांच्या संवर्धनासाठी प्रथमच करण्यात आल्याचा दावा या प्रकल्पाचे वारसा संरक्षण सल्लागार विनोद डॅनियल यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, भविष्यात देशात अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरही ममींचे जतन करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. (वृत्तसंस्था)>टोलेमी युगातील ममीदेशातील विविध संग्रहालयांमध्ये जतन करण्यात आलेल्या इजिप्तच्या फक्त सहा ममींपैकी ही एक आहे. ही ममी १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलीची असून इ.स.पूर्व ३०० ते १०० वर्षांपूर्वीच्या टोलेमी युगातील ती असावी, असा अंदाज यापूर्वी बांधण्यात आला होता.>अधिक तापमानाचा फटका ४अधिक उष्णता, प्रकाश, तापमान, दमटपणा, किडे आणि प्राणवायूमुळे ही ममी नष्ट होण्याच्या मार्गावर होती. परंतु आता नवीन आॅक्सिजनरहित पेटीमुळे विषाणु आणि किड्यांचा प्रादुर्भाव होणार नाही तसेच आर्द्रताही एका ठराविक पातळीवर नियंत्रित राहील, असे डॅनियल यांनी सांगितले. ४सीटी स्कॅन आणि एक्स रे काढल्यानंतर ही ममी पुन्हा संग्रहालयात आणून नव्याने तयार करण्यात आलेल्या पेटीत शो केसमध्ये ठेवण्यात आली. ममीवर प्रक्रिया करताना तिचा मेंदू आणि मुख्य अवयव काढून टाकण्यात आले होते. बरगड्या पूर्णपणे तुटल्या होत्या तर पाठीचा कणा आणि एक मनगट किंचित निखळले होते. ४ममीला नष्ट होऊ नये म्हणून आॅक्सिजनरहित पेटीत ठेवण्यात आले आहे.
२००० वर्षांपूर्वीच्या ममीचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जतन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2016 4:14 AM