रायपूर - छत्तीसगडमधीलभाजपाचे माजी आमदार प्राध्यापक गोपाल राम यांनी येथील जनतेला २० हजार कोटी रुपयांचं वाटप करण्याचं आश्वासन दिलं आहे. प्रत्येक मतदाराला प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यासाठी गावोगावी फिरून ते अभियान चालवत आहेत. तसेच वाटपासाठी ही रक्कम रिझर्व्ह बँक आणि डीआरडीओ उपलब्ध करून देईल, असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने त्यांच्या अॅक्सिस बँक खात्यात रक्कम ट्रान्सफर केली असून, केवायसी पूर्ण करून ते २ एप्रिलपासून या रकमेचं वाटप करतील, असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, या भाजपाच्या माजी आमदारांच्या दाव्याची संपूर्ण प्रदेसात चर्चा सुरू आहे.
प्राध्यापक गोपाल राम १९९८ मध्ये सरगुजा जिल्ह्यातील सीतापूर मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान, २०१८ मध्ये त्यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र ते निवडणुकीत पराभूत झाले होते. आता पुन्हा एकदा प्राध्यापक गोपाल राम चर्चेत आले आहेत. त्यांची चर्चा निवडणुकीसाठी नाही तर रुपये वाटण्याच्या त्यांच्या दाव्यावरून होत आहे. यामध्ये मतदार कुटुंबातील १६ वर्षांवरील मुलांना एक लाख आणि त्यापेक्षा लहान मुलांना ५० हजार रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
प्राध्यापक गोपाल राम यांनी आपल्या या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते गावोगावी फिरून लोकांना भेटत आहेत. त्यांच्याकडून बँक डिटेल्सची माहिती घेत आहेत. लोकांकडून फॉर्म भरून घेतले जात आहेत. आतापर्यंत दोन हजार लोकांनी फॉर्म भरले आहेत. दरम्यान, ही रक्कम का वाटणार असं विचारलं असता गोपाल राम यांनी सांगितले की, कोरोनामुळे अनेक लोकांचा रोजगार गेला आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे, लोकांसमोर अनेक समस्या आहेत. त्यामुळे या रकमेच्या माध्यमातून लोकांचं काहीतर भलं व्हावं, अशी इच्छा आहे.
दरम्यान, वाटण्यासाठी एवढी रक्कम कुठून आणणार, असं विचारलं असता गोपाल राम यांनी हा पैसा रिझर्व्ह बँक आणि डीआरडीओकडून येईल, असं सांगितलं. रिझर्व्ह बँकेने आपल्या खात्यात पैसे पाठवले आहेत. तसेच डीआरडीओकडूनही पैसे मिळतील, असे त्यांनी सांगितले. तसेच आपण डीआरडीओचे सदस्य असल्याचाही त्यांनी दावा केला. दरम्यान, या भागातील काही लोकांनी सांगितले की, या माजी आमदार महोदय गेल्या काही काळापासून प्रकृती अस्वस्थ्याचा सामना करत आहेत. तेव्हापासूनच ते अशी आश्वासने देत आहेत, असा दावा त्यांनी केला.