हैदराबाद - आंध्र प्रदेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासूनच आपली वेगळी छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राज्यातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी 'जगनन्ना वसति दीवेना योजना' सुरू केली आहे. या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात तब्बल 2300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वायएसआर सरकारने नुकतेच एक सर्वेक्षण केले होते, त्यानुसार 95,887 नवीन विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. दहावी आणि पुढील शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना या जगनन्ना वसति दीवेना योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना वर्षाला 20 हजार रुपयांची मदत सरकारकडून दिली जाणार आहे. ही पूर्ण रक्कम विद्यार्थ्याच्या आईच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. आत्तापर्यंत या योजनेसाठी 10,65, 357 विद्यार्थी पात्र होते, पण 95,887 विद्यार्थ्यांची आणखी भर यात पडली आहे. त्यामुळे, 'जगनन्ना वसति दीवेना योजनेसाठी' 11,61,224 विद्यार्थी पात्र असणार आहेत. लवकरच सरकारकडून या विद्यार्थ्यांना जगनन्ना वसति दीवेना योजनेचं कार्ड देण्यात येईल.
दरम्यान, यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून केवळ 800 कोटी रुपये खर्च करण्यात येत होते. मात्र, या वर्षीपासून 2,300 कोटी रुपयांची तरतूद विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आहे. त्यामुळे 1500 कोटी रुपयांचे बजेट वाढविण्यात आल्याचं स्पष्ट होतंय.