अयोध्या - अयोध्या येथे २००५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी प्रयागराज विशेष न्यायालयाने आज निकाल सुनावला आहे. या हल्ल्या प्रकरणी पाचपैकी चार आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर एका आरोपीची मुक्तता करण्यात आली आहे. अयोध्येतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आज प्रयागराज येथील विशेष कोर्टात पाच दहशतवाद्यांविरोधात शिक्षेची सुनावणी झाली. राम जन्मभूमी येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा सुनावली जावी अशी मागणी करण्यात येत होती. 5 जुलै 2005 रोजी सकाळी 9.15 च्या सुमारास दहशतवाद्यांनी रामजन्मभूमी परिसरात बॉम्बस्फोट घडवला होता. जवळपास अडीच तास चाललेल्या चकमकीत पोलिसांनी 5 दहशतवाद्यांना ठार केले होते. या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीर येथून अटक केली होती. अटक केलेल्या 4 दहशतवाद्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. त्यानंतर 2006 मध्ये प्रयागराजच्या विशेष कोर्टाच्या आदेशावर त्यांची रवानगी प्रयागराजच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती. रामजन्मभूमी परिसरात हल्ला करुन देशामध्ये धार्मिक दंगली घडविण्याचे षडयंत्र या दहशतवाद्यांनी आखले होते.