नवी दिल्ली: निर्भया प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींनी त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र त्यांची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे या तिघांच्या गळ्याभोवतीचा फास आणखी घट्ट झाला आहे.सर्वोच्च न्यायालयानं दोषींच्या पुनर्विचार याचिकेमुळे निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे दोषींची फाशीची शिक्षा कायम राहणार का? की त्यांची शिक्षा शिथील होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश आर भानुमती आणि अशोक भूषण यांनी दोषी विनय, पवन आणि मुकेश यांच्या पुनर्विचार याचिकेवर निकाल राखून ठेवला होता. तर या प्रकरणातील चौथा दोषी अक्षयनं पुनर्विचार याचिका दाखल केलेली नव्हती.
Nirbhaya Gangrape Case : निर्भयाच्या आरोपींची फाशीची शिक्षा कायम, SC ने पुनर्विचार याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 2:31 PM