नवी दिल्ली: पंजाबमध्ये शिख समुदायाकडून झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांच्या मृत्यूवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लिचिंगच्या घटनांवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. '2014 च्या आधी (मोदी सरकार येण्यापूर्वी) लिंचिंग (Lynching) हा शब्द ऐकायला मिळत नव्हता,'असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
राहुल गांधींचे ट्विट:
पंजाबच्या अमृतसर आणि कपुरथलामध्ये जमावाकडून दोन जणांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण शिख समाजाच्या भावनेशी संबंधित असल्यामुळे दोन्ही घटनांबाबत बहुतांश राजकारणी उघडपणे बोलायला तयार नाहीत. पण, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी अवमान करणाऱ्यांना सर्वांसमोर फासावर लटकवले पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. त्यानंतर आता राहुल गांधींनी लिचिंगवर भाष्य केले आहे.
भाजपचा पलटवार
राहुल गांधींच्या या ट्विटवर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पलटवार केला आहे. त्यांनी राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांना लिंचिंगचे जनक म्हटले आहे. मॉब लिंचिंगचे जनक राजीव गांधी यांनी त्यांच्या काळात अनेक हत्या केल्या. महिलांवर बलात्कार केला. शिखांच्या गळ्यात जळके टायर टाकले, असा आरोप त्यांनी केला आहे.
सुवर्ण मंदिर आणि कपूरथला येथे काय घडले?
अमतृतसरच्या सुवर्ण मंदिर आणि कपूरथला येथील लिंचिंगच्या घटनेने राज्यात तसेच संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. रविवारी कपूरथलाच्या निजामपूर गावात एका गुरुद्वारामध्ये एका तरुणाची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. त्याच्यावर निशान साहिबचा(शिखांचा धार्मिक ध्वज) अपमान केल्याचा आरोप होता. मात्र, नंतर हे प्रकरण चोरीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या व्यक्तीला कित्येक तास खोलीत कोंडून ठेवले आणि तलवारीने वारही केले. या घटनेत तीन पोलीसही जखमी झाले आहेत.
दुसऱ्या एका घटनेत शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने सुवर्ण मंदिराच्या आतील ग्रिलवर चढून पवित्र गुरू ग्रंथ साहिबचा अवमान केला. त्या व्यक्तीने तिथे ठेवलेली तलवारही उचलली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. यावेळी लोकांनी त्याला पकडून जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या दोन घटनांनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.