नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून काँग्रेसकडूनराहुल गांधी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना बसपाने विरोध दर्शविला आहे. बसपाच्या एका नेत्याने असे म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून योग्य असतील.
बसपाचे प्रवक्ते सुधींद्र भदौरिया यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्यापेक्षा विरोधी पक्षाकडून मायावतींना योग्य समजतात. तसेच, मायावती या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चार वेळा राहिल्या आहेत. राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती यांना जास्त अनुभव आहे. त्यामुळे मायावतींना सर्वजण प्रधानमंत्री पदाच्या उमेदावर म्हणून पाठिंबा देणार आहेत.
दरम्यान, 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसपाला एका सुद्धा जागेवर विजय मिळवता आला नव्हता. आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी महाआघाडी बनवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र काँग्रेसच्या या प्रयत्नांना सुरूंग लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार देत बसपाने राज्यातील सर्व 230 जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.