नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघ्या काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. ही निवडणूक भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासातली सर्वात महागडी निवडणूक असेल, असा दावा अमेरिकास्थित तज्ज्ञानं केला. पुढील महिन्यात निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात होणारी लोकसभा निवडणूक जगाच्या इतिहासातील सर्वात महागडी निवडणूक असेल, असा दावा मिलन वैष्णव यांनी केला. वैष्णव कार्गी इन्डॉवमेंट फॉर इंटरनॅशनल थिंक टँकच्या दक्षिण आशिया विभागाचे संचालक आहेत. '2016 मध्ये अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी 6.5 बिलियन डॉलर्सचा खर्च आला होता. तर 2014 मध्ये भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आलेला खर्च 5 बिलियन डॉलर्स इतका होता. आगामी लोकसभा निवडणुकीचा खर्च नक्कीच 6.5 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असेल. त्यामुळे ही जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरेल,' अशी आकडेवारी वैष्णव यांनी सांगितली. येत्या निवडणुकीत भाजपा आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार टक्कर होईल. सत्ताधारी आणि विरोधरकांमधील संघर्ष अटीतटीचा असेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होईल, असा कयास त्यांनी व्यक्त केला. भारतीय निवडणुकांमध्ये खर्च होणारा पैसा यावर वैष्णव यांचा गाढा अभ्यास आहे. 'येत्या निवडणुकीचा निकाल काय असेल, याची कल्पना नाही. मात्र ही निवडणूक जगातील सर्वात महागडी असेल, याबद्दल शंका नाही,' असं वैष्णव म्हणाले. भारतातील राजकीय पक्ष, नेते यांना मिळणाऱ्या निधीचा नेमका आकडा कधीच कळत नाही. कारण निधी मिळणारा पक्ष आणि पैसे देणारी व्यक्ती कधीच याबद्दलची स्पष्ट माहिती जाहीर करत नाही, असं निरीक्षणदेखील त्यांनी नोंदवलं.
'आगामी लोकसभा निवडणूक जगातील सर्वात महागडी ठरेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 5:55 PM