नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना तरुणांमध्ये जा, असे सांगून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत २०१९च्या लोकसभा निवडणुकीची जणू तयारीच केली. ना मै बैठुंगा, ना बैठने दुंगा, असे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला नुसते बसलेले मी पाहणार नाही, असा जणू इशाराच दिला. पुढील दोन वर्षे अधिक जोमाने काम करणे गरजेचे असून, सतत मतदारांशी संपर्क साधणे, त्यांचे प्रश्न सोडविणे आणि सर्व समाजघटकांना एकत्र आणणे हे करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या.डिजिटल पेमेंट अॅप्लिकेशनसाठी ‘भिम अॅप’च्या वापराला प्रोत्साहन मिळावे म्हणून पक्षाच्या नेत्यांनी आठवडाभर काम करावे, लोकांना त्याची माहिती द्यावी, प्रशिक्षित करावे व त्यांना ते अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी सर्व खासदारांना केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशभरातील अनुयायांना भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.डॉ. आंबेडकरांचे काम आणि त्यांच्या योगदानाची प्रसिद्धी करा, असेही मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या लोककल्याण कामांचे आणि उत्तम प्रशासनाचे तरुणांना सदिच्छा दूत (अॅम्बेसडर्स) बनवा, असे आवाहन करून मोदी म्हणाले की, तरुण पिढी माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्रांपेक्षाही मोबाइल फोन्स आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी याच माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे. तरुण पिढी जेव्हा १२वीच्या वर्गात असते, त्याचवेळी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत पक्षाला मिळालेले यश हे लोकांनी जातियवाद, एकाच कुटुंबाची सत्ता आणि भ्रष्टाचाराविरोधात यामुळे आहे. लोककल्याण आणि उत्तम प्रशासनाचा कार्यक्रम राबवला जात असलेल्या मोदींच्या नेतृत्वाला दिलेला कौल आहे, असे अमित शाह म्हणाले. २०१४मध्ये लोकसभा निवडणुकातील पक्षाच्या विजयानंतर नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका या पक्षासमोर मोठे आव्हान होत्या, असे सांगून शाह म्हणाले की, दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकादेखील असेच मोठे आव्हान आहे. पक्षाच्या नेत्यांनी त्यासाठी तयारी करावी. केंद्र सरकारने राबविलेल्या लोककल्याणाच्या योजना आणि नोटाबंदीसारख्या धाडसी निर्णयाला लोकांनी पाठिंबा दिल्याचेच भाजपाच्या विजयातून दिसते, असा दावा शाह यांनी केला. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह म्हणाले की, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील उत्साहवर्धक यशानंतर लोकसभेच्या निवडणुका या पक्षासमोर मोठे आव्हान आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरची भाजपाच्या संसदीय पक्षाची ही पहिलीच बैठक होती. मतदारांचे आभार आणि विजयाचा आनंद साजरा करताना पक्षाच्या प्रवासाचा मार्ग तयार करण्याचा उद्देश या बैठकीचा होता.नुकत्याच उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत लक्षणीय संख्येने दलितांनी भाजपाला मते दिल्याचे मानले जाते. दलितांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने पक्षाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून (१४ एप्रिल) आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करायचे ठरवले आहे. प्रत्येक पंचायत आणि वॉर्डात पक्ष आठवडाभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करील. याशिवाय पक्षाच्या स्थापना दिनी (६ एप्रिल) नेते आणि कार्यकर्ते ‘स्वच्छ भारत’ मोहिमेत सहभागी होतील.
भाजपाची २०१९ची तयारी
By admin | Published: March 17, 2017 1:01 AM