नवी दिल्ली : देशभरात २०२० मध्ये ५,५७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तथापि, त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत या संख्येत घट झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी संसदेत दिली. मागील वर्षी २०१९ मध्ये ५,९५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीचा हवाला देत कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यामागचे वेगळे कारण एनसीआरबीने अहवालात दिलेले नाही. लोकसभेत लेखी उत्तर देताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसह लोकांनी आत्महत्या करण्यामागच्या कारणांत कौटुंबिक समस्या, आजारपण, अमली पदार्थांचा गैरवापर/व्यसन, विवाहसंबंधी मुद्दे, प्रेम प्रकरणे, कर्जबाजारीपण, परीक्षेत अपयश, बेरोजगारी, व्यावसायिक/ करिअरसंबंधी समस्या किंवा संपत्तीचा वाद यांचा समावेश आहे. देशात, विशेषत: मध्य प्रदेशात खतांअभावी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सरकारला मिळालेली नाही.
महाराष्ट्रात सर्वाधिक२०२० मध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या एकूण घटनांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक २,५६७ घटना घडल्या. त्यानंतर कर्नाटक (१,०७२), आंध्र प्रदेश (५६४), तेलंगण (४६६), मध्य प्रदेश (२३५) आणि चंदीगडमध्ये २२७ घटना घडल्या. उत्तर प्रदेशात २०२० मध्ये ८७ शेतकऱ्यांंनी आत्महत्या केली. त्याखालोखाल तामिळनाडू (७९), केरळ (५७), आसाम (१२), हिमाचल प्रदेश (६), तसेच मेघालय आणि मिझोराम (प्रत्येकी चार) आहे.