- नितीन अग्रवालनवी दिल्ली : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानुसार २०२० मध्ये देशभरात एकूण ९३१ गुन्हेगार गुंगारा देत पोलिसांच्या तावडीतून पसार होण्यात यशस्वी झाले. यापैकी सर्वाधिक १०३ गुन्हेगार महाराष्ट्रातील आहेत. यापैकी ९२ गुन्हेगार कोठडीबाहेर अन्य ठिकाणी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलिसांच्या तावडीतून फरार झाले.राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार राज्यात गुन्हेगार पसार होण्याच्या एकूण ८८ घटना घडल्या. एकूण फरार गुन्हेगारांपैकी ७८ गुन्हेगारांनाच पुन्हा जेरबंद करण्यात आले; परंतु एनसीआरबीच्या ताज्या आकडेवारीत पुन्हा पकडण्यात आलेल्या गुन्हेगारांना फरार म्हटलेले नाही. तथापि अशा कोणत्याही प्रकरणात महाराष्ट्रातील एकाही पोलिसाला कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी आरोपी करण्यात आलेले नाही.महाराष्ट्रांनंतर मध्य प्रदेशातून ९२, पंजाबमधून ८६, ओडिशातून ६८, गुजरातमधून ६६ आणि उत्तर प्रदेशात ५७ गुन्हेगारांनी चकवा देत पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. मध्य प्रदेशात ७९ गुन्हेगारांना, पंजाबमध्ये ६४, ओडिशात २२, गुजरातेत ५८ आणि उत्तर प्रदेशात ४७ गुन्हेगारांना पुन्हा जेरबंद करण्यात आले. गुन्हेगार फरार होण्याच्या घटनेप्रकरणी एकूण ११७ पोलीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. असे सर्वाधिक गुन्हे पंजाबमध्ये ३९ , उत्तर प्रदेशात २४, तेलंगणमध्ये १०, केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये १० नोंदविण्यात आले. याप्रकरणी एकूण ८५ पोलिसांना अटक करण्यात आली. यापैकी २४ पंजाबचे, १२ उत्तर प्रदेशचे, १० तेेलंगणचे, १० जम्मू-काश्मिरचे होते.
२०२० मध्ये देशभरात पोलिसांच्या तावडीतून ९३१ गुन्हेगार झाले फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 6:08 AM