ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - नोटाबंदीनंतर देशात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्याचे प्रयत्न सुरू असताना नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड, एटीएम आणि पीओएस मशिन 2020 पर्यंत देशात कालबाह्य होतील असं म्हटलं आहे.
कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी नीती आयोगाने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. अर्थविषयक तंत्रज्ञान सामाजिक अविष्कार या बाबतीत भारतात मोठे बदल होत आहेत. या बदलामुळेच भारतात येत्या काळात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम मशीन आणि पीओएस मशीनची गरज उरणार नाही असे अमिताभ कांत यांनी म्हटले. प्रवासी भारतीय संमेलन 2017 या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे.
आपला देश एकमेव असा देश आहे की जेथे १ अब्ज लोक मोबाईल फोन वापरतात आणि त्यांच्याजवळ बायोमेट्रिक ओळख आहे. मोबाईल फोन आणि भीम अॅपच्या साहाय्याने आपण भविष्यात सर्व व्यवहार करू शकू असे ते म्हणाले.